Sujay Vikhe Patil On Prajakt Tanpure : राज्यात सध्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच गेल्या काही दिवसांपासून राहुरी विधानसभा मतदार संघात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी राहुरीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी दुसरा उमेदवार द्यावा लागला. मात्र, प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे त्यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

असं असतानाच आता भाजपाचे नेते तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘आता कोणत्याही बांधावर गेलात तरी फक्त ‘कमळ’च दिसेल’ असं म्हणत ‘आता भाजपात तीन-तीन ‘दादा’ दिसतील’ असं भाष्य करत सुजय विखे यांनी मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. सुजय विखे यांनी नेमकं काय संकेत दिले? प्राजक्त तनपुरेंनी उमेदवारी अर्ज माघारी घेताना काय घडलं होतं? याबाबत जाणून घेऊयात.

सुजय विखे यांनी काय संकेत दिले?

“मी आता माझ्या कारखान्याचा शतकी अधिकारी देखील झालो आहे. आता मीच तुम्हाला ऊसतोड देणार आणि मीच सर्व काही बरोबर मार्गी लावतो. आगोदर काय व्हायचं की कारखान्याची ऊसतोड या बांधावरून थोडीशी दुसरीकडे सरकली की लगेच तनपुरेंच्या शेतात गेली म्हणायचे, किंवा विखे पाटल्यांच्या शेतात, अशा चर्चा व्हायच्या. मात्र, आता असा काही विषयच राहिला नाही. आता कोणताही बांध ओलांडला तरी फक्त ‘कमळ’च दिसेल. त्यामुळे काही फरक पडत नाही. हे मी माझा त्रास कमी करण्यासाठी केलं हे मी तुम्हाला सांगतो”, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.

आता तीन-तीन ‘दादा’ एकत्र

“याआधी फक्त ‘कमळा’साठी एकच ‘दादा'(सुजय दादा) वर भागायचं. आता तीन-तीन ‘दादा’ (अक्षय दादा, प्राजक्त दादा आणि सुजय दादा) मग काय घ्या मजा करून. मला काही वेळापूर्वीच एकजण म्हणाले की काहीजण आपल्याकडे येत आहेत. मी त्यांना म्हणालो की कोणालाच एकट्याला आणू नका. एक-एक प्रवेश कशाला करायचे? ‘पॅकेज’ म्हणजे पूर्ण समुहाने पक्षात घ्यायचं. हा जो सर्व काही कार्यक्रम झालेला आहे, त्यामध्ये माझं थोडंफार योगदान निश्चित आहे”, असं सूचक भाष्य करत सुजय विखे पाटील यांनी मोठे संकेत दिले आहेत.

फडणवीसांचा एक फोन अन् तनपुरेंची पोटनिवडणुकीतून माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती. या भेटीवेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्राजक्त तनपुरे यांची बंद दाराआड चर्चा झाल्याचीही चर्चा आहे. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. मात्र, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून प्राजक्त तनपुरे यांचं मन वळवल्याचंही सांगितलं जातं.

तनपुरेंनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचं कारण काय सांगितलं होतं?

“राहुरी तालुक्याचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याचा ध्यास मनात ठेवून मी या विधानसभा पोटनिवडणुकीकडे पाहत होतो. याच जाणिवेतून राहुरीच्या विकासासाठी, इथल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, युवकांच्या स्वप्नांसाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी मी ही पोटनिवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. मात्र, आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी माझी भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली. या चर्चेदरम्यान मी त्यांच्यासमोर राहुरीच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले. राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या आणि मला समाधान आहे की त्या सर्व मुद्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या मान्य केल्या”, असं प्राजक्त तनपुरेंनी म्हटलं होतं.

“जरी आपल्या राहुरीचा आमदार दुसऱ्या तालुक्यातील होणार असला, तरी राहुरीच्या विकासात कोणतीही तडजोड होणार नाही, असा ठाम विश्वास आणि आश्वासन त्यांनी दिलं. त्यांच्या या विनंतीचा मान राखत आणि स्व.शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली अर्पण करत मी ही राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नाही. पण हा निर्णय म्हणजे आपली लढाई थांबली असा अजिबात अर्थ नाही. आपण दोन पावले मागे घेतली आहेत. पण आता त्यानंतर चार पावले पुढे जाण्याची तयारी आहे. राहुरीच्या विकासाची, आपल्या हक्काची ही लढाई अशीच सुरू राहील अधिक ताकदीने, अधिक निर्धाराने. या संपूर्ण प्रवासात माझे कुटुंबीय, हितचिंतक आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते ज्या ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, त्या प्रत्येकाचा मी मनापासून ऋणी आहे. तुमचा विश्वास, तुमचं प्रेम, आणि तुमची साथ हीच माझी खरी ताकद आहे. यापुढील काळात देखील आपण असेच प्रेम द्याल व माझ्या पाठीशी उभे रहाल हा विश्वास आहे”, असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं होतं.