अहिल्यानगर : महाविकास आघाडी बारामती पोटनिवडणुकीसाठी सर्व काही करू शकते तर राहुरीसाठी का करू शकत नाही? महाविकास आघाडीने राज्यस्तरावर या दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, यामागे एक षडयंत्र आहे. विखे कुटुंबीयांना हे षडयंत्र नवीन नाही, ते आम्ही पत्कारलेलेच आहे. त्याला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या मागे आम्ही ताकद लावू, असे आव्हान भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे यांनी दिले आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराचे नियोजनासाठी माजी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीत आमदार संग्राम जगताप उमेदवार कर्डिले उपस्थित होते.

बारामती व राहुरी पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी वेगवेगळी भूमिका ठेवली, याकडे लक्ष वेधले असता सुजय विखे यांनी वरील प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, हे राजकारण त्यांच्या माध्यमातून बरेच जुने आहे आणि ते महाराष्ट्रात घडत आले आहे. महाविकास आघाडी बारामतीसाठी सर्व काही करू शकत होती तर राहुरीसाठी का नाही.

शेवटी परिस्थिती दोन्हीकडे एकसमान होती. बारामतीत दादांचे सक्षम नेतृत्व होते, त्यांनी सहा-सात वेळा प्रतिनिधित्व केले. शिवाजी कर्डिलेही सहावेळा आमदार होते. परंतु हे षडयंत्र आमच्यासाठी नवीन नाही. हे षडयंत्र मागे ठेवून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अक्षय कर्डिले यांच्या मागे ताकद लावू.

साकळाई उपसा सिंचन योजना मंजूर झाल्याबद्दल बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांनी संघर्ष करून ही योजना पुढे नेली. स्व बाळासाहेब विखे, स्व. शिवाजी कर्डिले, बबनराव पाचपुते यांचे स्वप्न होते की शेतकऱ्यांची शेती बागायत व्हावी. त्यांनी पाण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या प्रयत्नांना आमचाही हातभार लागला. त्यामुळे योजनेसाठी निधी मंजूर झाला. याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे.

कार्यकर्त्यांना आवाहन करताना सुजय विखे यांनी सांगितले की, राहुरीची पोटनिवडणूक ताकतीने लढवा. कुणीही गाफील राहू नका, सर्वांना सोबत घेऊन प्रचार यंत्रणा मजबूत करा, स्व. शिवाजी कर्डिले यांनी २५ ते ३० वर्षे नगर तालुका एक संघ ठेवला. त्यांच्या जनसेवेची परंपरा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा. त्यांच्या विकासकामावर मते मागा व अक्षय कर्डिले यांना आमदार करून त्यांचे स्वप्न पूर्ण करा.

बैठकीत आमदार संग्राम जगताप यांनी म्हणाले, बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राहुरीत अक्षय कर्डिले मोठ्या मताधिक्याने विजय होतील. स्व अजित पवार व स्व. शिवाजी कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, उपसभापती रभाजी सूळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अमोल गाडे, रोहिदास कर्डिले, संदीप कर्डिले, जालिंदर कदम, संतोष म्हस्के, अभिलाष घिगे आदी उपस्थित होते.

खासदार लंके यांना टोला

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर बोलताना सुजय विखे यांनी खासदार नीलेश लंके यांचे नाव न घेता टोला लगावला. विखे म्हणाले, एसआयटी स्थापन झाली असून चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचे जाळे मोठे पसरले आहे. परंतु ४० वर्षे राजकारणात असूनही यात कुठेही विखे कुटुंबाचा संबंध आढळून येत नाही. परंतु काही लोकप्रतिनिधी सिस्पे, खरात, घोटाळा, खंडणी प्रकरणात सर्वत्र दिसतात. सर्वत्र दिसणारे असे लोकप्रतिनिधी समाजहिताचे नाहीत.