scorecardresearch

“शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसच्या आमदारांमध्येही अस्वस्थता, लवकरच…”; भाजपा खासदाराचा दावा

माजी आमदार आशीष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

“शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसच्या आमदारांमध्येही अस्वस्थता, लवकरच…”; भाजपा खासदाराचा दावा
फोटो- लोकसत्ता ग्राफीक्स टीम

माजी आमदार आशीष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. आशीष देशमुख यांच्या मागणीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, यासंदर्भात बोलताना शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसचे आमदारही अस्वस्थ असून काँग्रेसमध्ये लवकरच राजकीय भूकंप बघायला मिळेल, असा दावा भाजपा नेते सुजय विखे पाटील यांनी केला आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा…”, अमृता फडणवीसांचा उल्लेख करत सुषमा अंधारेंचं टीकास्त्र!

काय म्हणाले सुजय विखे पाटील?

“काँग्रेसमध्ये सध्या धुसपूस आहे. ती यापूर्वीदेखील होती. कारण ठराविक नेतेच फक्त मलाई खात होते आणि बाकीचे वंचित राहात होते. अनेक आमदारांची कामं होत नव्हती. बाकीच्या पक्षाचे सोडा, मात्र काँग्रेसचे मंत्रीच त्यांचे काम करत नव्हते. खरं तर एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली हे एक निमित्त झालं. मात्र, ज्याप्रकारे शिवसेनेच्या आमदारांमध्ये धुसपूस होती. त्याप्रमाणे काँग्रेसच्या आमदारांमध्येही प्रचंड अस्वस्थता आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सुजय विखे पाटील यांनी दिली. तसेच “ही सुरूवात असून भविष्यात काँग्रेसमध्ये निश्चित मोठा भूकंप येईल”, असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा – नागपूर : महाराष्ट्रात कॉंग्रेसची स्थिती चिंताजनक, माजी आमदाराच्या लेटर बॉम्बमुळे कॉंग्रेसमध्ये भूकंप

आशीष देशमुखांचे खरगेंना पत्र

काँग्रेसचे माजी आमदार आशीष देशमुख यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. ”सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने कॉंग्रेसवर नामुष्की ओढवली असून याला प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची दाणादाण उडत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कॉंग्रेस पुढच्या काळात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल यासाठी आम्ही कामकाज करू, असे त्यांनी ठासून सांगितले होते. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची वाताहत सुरु झाली आहे”, असे आशीष देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 09:54 IST

संबंधित बातम्या