Sukhbir Singh Badal Attacked : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तथा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज (१३ ऑगस्ट) नांदेडमधील गुरुद्वारामध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुखबीर सिंग बादल यांच्या हाताला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेतील हल्लेखोर जसपाल सिंगला अटक करण्यात आली आहे.

हल्लेखोर जसपाल सिंग हा मूळचा पुण्यातील असल्याची माहिती सांगितली जात आहे. मात्र, हल्लेखोर जसपाल सिंगने सुखबीर सिंग बादल यांच्यावर अचानक हल्ला केला का केला? हल्ला करण्यामागचा हेतू काय होता? याचा तपास पोलीस करत आहेत. या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर सुखबीर सिंग बादल यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली आहे.

नांदेडच्या पोलीस अधीक्षकांनी काय सांगितलं?

“पायऱ्यांजवळ एक सेवादार अचानक जवळ आला आणि त्याने आपल्या जवळील कृपाणने (तलवार) हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर लगेच हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याची पुढील चौकशी करण्यात येत आहे. या हल्लेखोराचं वय ६०-६२ वर्षाच्या दरम्यान असून तो दोन वर्षांपासून गुरुद्वारात ‘सेवादार’ म्हणून काम करत होता. ही सुरक्षेतील कोणतीही त्रुटी नव्हती. कारण अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी ‘झेड-प्लस’ सुरक्षा कवच तैनात होतं. त्या अनुषंगाने आमचे पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी तिथे उपस्थित होते. त्यामुळे आम्ही हल्लेखोराला त्वरित रोखू शकलो आणि ताब्यात घेऊ शकलो”, असं नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी म्हटलं आहे.

हल्लेखोराने पोलिसांना काय सांगितलं?

“हल्लेखोराने सुरुवातीला स्वतःच सांगितलं की पंजाबमधील अंमली पदार्थांच्या समस्यांमुळे तो संतप्त होता. मात्र, त्याचा कोणत्याही टोळीशी संबंध असल्याचं अद्याप निष्पन्न झालेलं नाही. तसेच हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आम्ही सध्या त्याची चौकशी करत आहोत. या प्रकरणात नांदेड पोलीस आणि एटीएस संयुक्तपणे तपास करत आहेत”, अशी माहिती नांदेडच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितली. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांचे चौकशीचे आदेश

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुखबीर सिंग बादल यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तसेच नांदेड पोलिसांना त्यांनी या घटनेमागील उद्देशाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.