मुंबई : आखाती युद्धामुळे विस्कळीत झालेली कांदा निर्यात आणि बिगर आखाती देशांतून फारशी मागणी नसल्यामुळे निर्यातक्षम उन्हाळी कांद्याचे दर निम्म्यावर आले आहेत. निर्यातक्षम कांद्याला सरासरी २००० ते २५०० रुपये प्रति क्विंटल दर अपेक्षित असताना नाशिकमधील प्रमुख बाजार समित्यांमध्ये जेमतेम ९०० ते १३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

नाशिक मधील कांदा उत्पादक पट्ट्यातील उन्हाळी काद्यांची काढणी वेगाने सुरू आहे, महिनाअखेर काढणी पूर्ण होईल. ऐन काढणीच्या वेळेत उन्हाळी पावसाचा कांद्याला फटका बसला. शेतशिवारात काढलेला कांदा पावसात भिजला. हे नुकसान कमी म्हणून निर्यातक्षम कांदा निर्याती अभावी मातीमोल ठरत आहे. नाशिक परिसरात उत्पादित झालेल्या निर्यातक्षम उन्हाळी कांद्याला सरासरी २००० ते २५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळतो. पण, यंदा निर्यात विस्कळीत झाल्यामुळे दर्जेदार कांद्याला जेमतेम ९०० ते १३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

नाशिक बाजार समितीत सोमवारी, १३ एप्रिल रोजी उन्हाळी कांद्याला सरासरी ८११ रुपये प्रति क्विंटल,  लासलगावमध्ये सरासरी ११५० रुपये, जळगावात सरासरी ९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. दर्जेदार कांद्यालाही १३०० रुपयांहून जास्त दर मिळत नसल्याची स्थिती आहे. लाल कांद्याचे दर ५०० रुपये क्विंटलवर आहेत.

विस्कळीत निर्यातीमुळे दरात पडझड

युद्धामुळे आखाती देशांमध्ये उपजिविकेसाठी गेलेल्या लोकं आपआपल्या देशांत माघारी आली आहेत. उपजिविकेसाठी आखातात वास्तव्यास असलेली लोकसंख्या मोठी आहे. शिवाय अद्यापही होर्मुजची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली नाही, त्यामुळे आखाती देशांना फारशी निर्यात होत नाही. सध्या श्रीलंका, थायलंड, मलेशिया, सिंगापूरला कांद्याची निर्यात होत आहे. युरोपीय देशांना अद्याप निर्यात सुरू झालेली नाही. मे महिन्यापर्यंत निर्यातीला गती येईल. युद्धजन्य स्थितीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. सध्या शेतकऱ्यांना निर्यातक्षम उन्हाळी कांद्याला प्रति किलो ९०० ते १३०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे, अशी माहिती कांदा निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष अजित शहा यांनी दिली.

उत्पादन खर्चही निघेना

उन्हाळी कांद्याची काढणी वेगाने सुरू आहे. उत्पादन खर्च भागून चार पैसे शेतकऱ्यांच्या हातात राहण्यासाठी उन्हाळी कांद्याला किमान २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळणे अपेक्षित आहे. पण, सध्या ७०० ते १३०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. यंदा निर्यातीवर केंद्र सरकारचे निर्बंध नाहीत. पण, युद्धाचा फटका आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.