मुंबई : सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली तशीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही त्यांचीच निवड व्हावी, अशी गळ पक्षाच्या आमदारांनी घातली आहे. पक्ष भाजपच्या दावणीला बांधू नये, असाही आमदारांमध्ये एक सूर आहे.

पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाची निवड करण्यासाठी रविवारी विधिमंडळातील अजित पवार यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. दुपारी अडीच वाजता बैठक संपली. त्यानंतर ठरावाचे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे व धनंजय मुंडे हे वरिष्ठ नेते ‘वर्षा’ निवासस्थानी रवाना झाले.  इकडे बैठक झालेल्या दालनात काही नाराज आमदार व मंत्र्यांनी एक अनौपचारीक बैठक घेतली.

 पक्षात जे चालले आहे, ते योग्य नाही. आपल्याला विश्वासात घेतले जात नाही. आजच्या बैठकीत इतरांना बोलू दिले नाही. पक्षाध्यक्षांसंदर्भात काय ठरले आहे, याची काही माहिती नाही. पक्षाचा अध्यक्ष हा पवार कुटुंबातील असावा. पक्षाच्या विलीनीकरणाबाबत आपल्याला काही सांगितले जात नाही. पक्ष भाजपच्या दावणीला बांधला जात आहे, अशा शब्दांत उपस्थित आमदार संताप व्यक्त करीत होते.  या आमदारांनी एका निवेदनामध्ये सुनेत्रा पवार यांनीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदसुद्धा स्वीकारावे, असे नमूद केले आहे.

आज बैठक?

अनेक आमदार बैठकीनंतर शपथविधीसाठी बाहेर पडले. त्यांना या घडामोडीची कुणकुण नव्हती. उपस्थित आमदारांनी त्यावर सह्या केल्या.  त्या निवेदनावर पाथरीचे आमदार राजेश विटेकर, अणुशक्तीच्या आमदार सना मलिक, अंमळनेरचे आमदार अनिल पाटील, मावळचे सुनील शेळके, सिन्नरचे माणिकराव कोकाटे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी लगेचच सह्या केल्या होत्या. यासंदर्भात पत्रावर सह्या असणार्‍या आमदारांनी सांगितले की, आणखी आमदारांना या निवेदनावर सह्या करायच्या आहेत. सोमवारी हे पत्र आम्ही सुनेत्रा पवार यांना देणार आहोत. पक्षाध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलावावी, अशी मागणी आम्ही पक्ष सरचिटणीसांकडे  करणार आहोत, असे या आमदारांनी सांगितले.

काँग्रेसच्या तुलनेत भाजपमध्ये तेवढी घराणेशाही नाही. डाव्या पक्षांमध्ये कधीच घराणेशाहीला स्थान मिळाले नाही. प्रादेशिक पक्षांमध्ये मात्र राजघराण्याच्या धर्तीवर उत्तराधिकारी नेमला जात असल्याचेच अनुभवास येते.