Sunetra Pawar News : २८ जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवार मुंबईहून बारामतीला पोहचत होते. त्याचवेळी विमानाचं क्रॅश लँडिंग झालं आणि अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक, विमानाचे वैमानिक, फ्लाईट अटेंडंट अशा सगळ्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राला शोकसागरात बुडवणारी ही बातमी ठरली. तसंच २९ जानेवारीला अजित पवारांना साश्रू नयनांनी महाराष्ट्राने निरोप दिला.

२८ जानेवारीला सुनेत्रा पवार दिल्लीत

२८ जानेवारीला म्हणजेच अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार हे सगळे दिल्लीमध्ये होते. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने हे सगळे दिल्लीत होते. २८ जानेवारीच्या सकाळी अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला आहे हे सुनेत्रा पवार यांना फोनवरुन कळवण्यात आलं. त्यांचा सुरुवातीला या बातमीवर विश्वासच बसला नाही. मात्र पुढच्या काही मिनिटांत त्यांच्या समोर वास्तव आलंच. कारण ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणाहून एक व्हिडीओ कॉल सुनेत्रा पवार यांना आला. तिथली परिस्थिती त्यांनी पाहिली आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे याची जाणीव त्यांना झाली.

सुनेत्रा पवारांनी व्हिडीओ कॉलवर काय पाहिलं?

सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या फोनवर हे पाहिलं की बारामतीच्या विमानतळाजवळ एक खासगी विमान अपघातग्रस्त होऊन जळत पडलं आहे. विमानाचे तुकडे विखुरले आहेत. सुनेत्रा पवारांनी त्यांच्या फोनवर हे दृश्य पाहिलं आणि त्या भावनिकदृष्ट्या कोसळल्याच. अजित पवारांचा मृत्यू झाला आहे याची जाणीव त्यांना या फोनने दिली. नियतीने वेळ साधली आहे हे त्यांना कळलं आणि त्यांना अतीव दुःख झालं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. अजित पवारांचं निधन झालं आणि बारामतीसह सगळा महाराष्ट्र हळहळला.

अजित पवारांचं विमान ८.५० ला बारामतीत उतरणार होतं

अजित पवारांना मुंबईहून घेऊन निघालेलं विमान सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी बारामतीत उतरणार होतं. अजित पवारांच्या बारामती येथील कार्यालयातले काही कर्मचारी विमानतळावर पोहचले होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीत पोहचले होते. त्यादिवशी त्यांच्या चार रॅली होत्या. साधारण ८.४६ च्या दरम्यान अजित पवार ज्या विमानात होते त्या विमानाने दोन घिरट्या घातल्या आणि ते विमान एका बाजूला झुकलं त्यानंतर ते कोसळलं आणि महाराष्ट्राने लोकनेता गमावला. प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताबाबत माध्यमांना विमान नेमकं कसं कोसळलं याची माहिती दिली.