Sunetra Pawar Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत अकाली निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.

त्याआधी सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला. त्यानंतर अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

सुनेत्रा पवारांचा एवढ्या घाईने शपथविधी का? अनिल पाटील यांचं मोठं वक्तव्य

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी एवढी घाई का? एवढ्या घाईने शपथविधी का करण्यात येत आहे? यामागचं कारण काय? असा पत्रकारांनी विचारलं. यावर अनिल पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “आपल्या या सर्व गोष्टी जरी घाईच्या वाटत असल्या तरी ती काळाची गरज आहे. मग ती मजबुरीने का असेना. पण हीच काळाची गरज आहे. राष्ट्रवादीचा गटनेता निवडणं हे काम राष्ट्रवादीचे आमदारच करू शकतात. त्यामुळे पक्षाच्या सर्व आमदारांच्या भावना लक्षात घेतल्या असता हा निर्णय घेणं भाग पडत आहे”, असं अनिल पाटील यांनी सांगितलं.

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांनी काय म्हटलं?

सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांच्याबरोबर माझी कोणतीही चर्चा झाली नाही. ज्या चर्चा मी ऐकतोय, त्या मुंबईत सुरू आहेत, मी येथे (बारामतीत) आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. आता प्राधान्याने काय करावं? हे त्यांनी ठरवलेलं दिसत आहे. त्यांच्या आधी-मधी मी भाष्य करणार नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.