मुंबई : ‘माझ्यावर पक्षाध्यक्ष म्हणून दिलेली जबाबदारी कठीण असली तरी तुमच्या पाठिंब्यामुळे ती अशक्य नाही. राष्ट्रवादी हा पक्ष नसून एक कुटुंब व परिवर्तनाचा विचार आहे. अजितदादांनी ज्याप्रमाणे कुटुंब म्हणून पक्षाला सांभाळले, तशीच मी सांभाळेन, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नूतन राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरण वरील चर्चेवर काहीही मतप्रदर्शन करण्याचे टाळले.
वरळीच्या डोम सभागृहात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. अधिवेशनाला आमदार, खासदार, मंत्री, पक्षाचे पदाधिकारी आणि देशभरातून निमंत्रीत सदस्य उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मांडला. त्याला खासदार सुनील तटकरे यांनी अनुमोदन दिले. सभागृहातील उपस्थितांनी हात उंचावून सुनेत्रा पवार यांच्या निवडीला संमती दिली.
राष्ट्रीय अध्यक्ष हे पद नाही तर लाखोंच्या आशा पूर्ण करण्याची संधी आहे. आपल्याला एका निर्धाराने पुढे जायचे आहे. केवळ अडीच वर्षेच अजित पवारांना पक्षाध्यक्ष सांभाळता आले. त्यांची सर्व स्वप्ने आपल्याला पूर्ण करायची आहेत. अजित पवारांची जिद्द, शिस्त व त्यांनी घडवलेला कार्यकर्ता पक्षाची ताकत आहे. हा पक्ष संघर्षातून स्थापन झाला. पक्षाची जेमतेम २७ वर्षांची वाटचाल असून राष्ट्रवादी ऐन तारुण्यात आहे, असे सुनेत्रा म्हणाल्या.
शरद पवारांचा उल्लेख टाळला
अजित पवारांविषयी बोलताना सुनेत्रा यांना हुंदका आवरता आला नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्यासह व यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे. तुम्ही प्रत्येक जण पक्षाचे अध्यक्ष आहात. तुमचा विश्वास ही माझी ताकद आहे. पार्थ व जय या माझ्या मुलांप्रमाणे राष्ट्रवादी आजपासुन माझे कुटुंब आहे, असे वचन सुनेत्रा यांनी दिले. राष्ट्रवादीचा स्थापनेपासूनचा आढावा घेताना सुनेत्रा यांनी संस्थापक शरद पवार यांच्या नावाचा नामोल्लेख टाळला.
महिला नेतृत्वाचा वारसा सांगताना त्यांनी आजेसासु व शरद पवारांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांचे नाव मात्र घेतले. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी तर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. सुनेत्रा यांचा मुलगा जय बैठकीत अग्रभागी होता. सूरज चव्हाण यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले.
दादांचा पदोपदी अवमान : सुनील तटकरे
१९९९ मध्ये राष्ट्रवादी स्थापनेनंतर विधानसभेला ५७ जागा आल्या. मात्र अजित पवार पक्षात सक्रीय होताच २००४ मध्ये तब्बल ७१ जागा निवडूनआल्या. अजित पवार यांना तेव्हा मुख्यमंत्री का केले नाही हा मोठा प्रश्न आहे. माझी, छगन भुजबळ आणि अजित पवार यांची आमचे सरकार असूनही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खुली चौकशी करण्यात आली. अजितदादांचा अखंड राष्ट्रवादीमध्ये पदोपदी अवमान करण्यात आला, असा आरोप तटकरे यांनी आपल्या भाषणात कुणाचे नाव न घेता केला. आमच्या पक्षाविषयी काही बोलाल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा तटकरे यांनी दिला.
पटेल, भुजबळांचे प्रश्न
आमच्या पक्षाशी ज्यांचा संबंध नाही, असे लोक अजित पवार यांच्या निधनाविषयी आणि पक्षातील घडमोडी विषयी बोलत आहेत. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक आहे, असा आरोप पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला. आम्ही सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची घाई केला, असा आरोप केला जातो आहे. मात्र दादांचे पार्थिव समोर असतानाच पक्षाच्या विलीनकरणाची तुम्ही चर्चा उपस्थित केली, त्याचे काय, असा सवाल पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला.
