Sunetra Pawar Emotional राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ जानेवारीला बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अजित पवारांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. पवार कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळलाच. पण आपला माणूस गेला अशी भावना प्रत्येक माणसाच्या मनात होती. अजित पवारांच्या निधनाची ही बातमी चटका लावणारी ठरली. दरम्यान अजित पवारांच्या मृत्यूनंतर ३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर १३ दिवसांनी त्यांनी पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी केलेलं पहिलंच भाषण चर्चेत आलं आहे. पंचायत समिती सदस्यांचे आभार त्यांनी मानले आहेत. अजितदादा प्रचारासाठीच पोहचत होते आणि एका क्षणात आपण पोरके झालो असं त्यांनी म्हटलं आहे.
सुनेत्रा पवार भाषण करताना झाल्या भावूक
“सर्वप्रथम मी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये पूर्णच्या पूर्ण सीट जिंकून जो विक्रम केला आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. दादांच्या मनातलं स्वप्न तुम्हाला साकार करण्याची संधी मिळाली आहे. दादांच्या मनातलं स्वप्न साकार कराल अशी खात्री बाळगते. मला आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं की इथे येऊन तुमच्याशी बोलेन. दादांनी उत्साहाने सगळा प्रचार केला होता. प्रत्येक निवडणुकीत ते जिवाचं रान करत असायचे. त्यामुळेचे ते सकाळी सकाळी इकडे यायला निघाले पण एका क्षणात आपण सगळे पोरके झालो. दादांचं ध्येय हे फक्त काम आणि कामच असल्याने त्यांना आवडतील अशा गोष्टीच आपण केल्या पाहिजेत. ” असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता. पण स्वतःला सावरत त्यांनी हे भाषण केलं.
दत्ता भरणेही छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित
राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांना प्रोत्साहन आणि नवीन ऊर्जा देण्यासाठी भाषण करताना त्या भावूक झाल्या. दादांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत. तुम्ही दादांचे स्वप्न तुम्ही पूर्ण कराल याची खात्री आहे असे सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी त्यांच्या शेजारी कृषी मंत्री दत्ता भरणेही बसलेले दिसले.
विलीनीकरणाच्या चर्चांना एक प्रकारे पूर्णविराम
अजित पवारांच्या जाण्यानंतर दोन पक्ष विलीन होतील अशाही चर्चा रंगल्या होत्या. अजित पवारांनी १२ फेब्रुवारीला दोन पक्ष एकत्र येतील अशी तारीख ठरवली होती असंही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे सांगण्यात आलं. मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी विलीनीकरणाची चर्चा झाली नव्हती. अजितदादा जे म्हणाले होते तो विषय महापालिका आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांपुरता मर्यादित होता असं वक्तव्य केलं आहे. दरम्यान जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एक प्रकारे चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. सुनेत्रा वहिनींच्या मार्गात अडचण निर्माण होईल असं आम्ही काहीही करणार नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
