Sunetra Pawar emotional post on Ajit Pawar birthday news : राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांची आज जयंती आहे. २८ जानेवारी रोजी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकस्मित निधनामुळे अवघा देश हळहळला होता. इतके वर्षे वाढदिवस साजरा करणाऱ्या दादांची आज जयंती साजरी करताना महाराष्ट्रातील दादाप्रेमींच्या भावना दाटून आल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांबरोबरचे काही खास क्षणही फोटोद्वारे शेअर केले आहेत.

सुनेत्रा पवारांची अजित पवारांसाठी खास पोस्ट

“एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा. पण आज तुमचा हाच दिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा”, अशा शब्दांत सुनेत्रा पवारांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या.

“अचानक सगळं पोरकं झालंय”

“आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात. तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ. आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं”,असं म्हणत सुनेत्रा पवारांनी त्यांचं दुःख शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला.

“आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत. दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील. माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम”, असं म्हणत सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना शब्दरुपी आदरांजली वाहिली.