Sunetra Pawar expressed her deep grief over the loss of Ajit Pawar : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकरता आजचा शेवटचा दिवस आहे. बारामतीच्या …प्रांगणात पोटनिवडणुकीसाठी सांगता सभा पार पडत आहे. या सभेकरता राज्यभरातील सत्ताधारी आणि विरोधातील अनेक नेते उपस्थित आहेत. यावेळी भाषण करताना सुनेत्रा पवारांचा कंठ दाटून आला. पण भावनेच्या भरात अश्रू डोळ्यांतून ओघळण्याआधीच त्यांनी त्यांच्या भावना आवरल्या आणि भाषण सुरू ठेवलं.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आज मी इथे उभी आहे, महायुतीचा उमेदवार म्हणून.. फक्त उमेदवार म्हणूनच नाही तर अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची जबाबदारी घेऊन. दादा गेले पण त्यांची स्वप्न अजूनही जिवंत आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करण्याकरता मी आज रणांगणात उतरली आहे. ही लढाई सोपी नाही. पण मी एकटीही नाही. कारण मला विश्वास आहे, माझ्या मागे संपूर्ण बारामतीकरांची ताकद उभी आहे. ही माती माझी आहे. तुम्ही माणसं माझी आहात. तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास आहे. आज मी तुमच्याकडे मत मागायला येथे उभे राहिले नाही. मी तुमच्याबरोबर नातं टिकवायला उभे आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही.”

माझं सर्वस्व हरपलंय

“खरं सांगायचं तर माझं दुख मोठं आहे”, असं म्हणताना सुनेत्रा पवारांचा कंठ दाटून आला. अश्रू अनावर झाले. पण अश्रूंना सावरत त्या पुढे म्हणाल्या, “माझं तर सर्वस्व हरवलंय, पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचं स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी या साऱ्यांच्या बळावर हे शिवधनुष्य उचलून मी पुढे चालत राहण्याचा निर्धार केला आहे. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण त्यांच्या विचारांचा, कार्याचा वारसा पुढेझे नेण्याचा ताकदीने प्रयत्न करेन”, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

मी संघर्षयोद्धाची सहचारिणी

“दु:खाला कवटाळून न बसता मी दादांचं कार्य पुढे नेण्याकरता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उभी आहे. माझ्याबरोबर कोणी असो वा नसो, जोपर्यंत तुम्ही बारामतीकर जनता माझ्या पाठीशी आहात, तोपर्यंत मी खचणार नाही, मागे हटणार नाही. मी एका संघर्षयोद्धाची सहचारिणी आहे. येसूबाई जशा लढल्या, अहिल्याबाईंनी जसा कारभार चालवला आणि आपल्या लोकांना न्याय दिला, त्या निष्ठेने मी तुमची सेवा करेन. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा ही महाराष्ट्राची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचीही तीच विचारधारा राहिलेली आहे. यापुढेही ती तशीच राहील याची मी खात्री देते. बारामती माझी ताकद आहे. तुम्ही बारामतीकर माझ्या जीवाभावाच्या कुटुंबातील माणसं आहात, हीच भावना उराशी बाळगून सतत काम करत राहणार आहे”, असा विश्वासही त्यांनी बारामतीकरांना दिला.