Maharashtra Politics NCP Party News : राष्ट्रवादी अजित पवार गटात सध्या सारे काही आलबेल नाही हे वारंवार अनुभवास येऊ लागले आहे. गेल्याच आठवड्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार यांची भेट घेऊन पक्षाच्या भवितव्याबद्दल चर्चा केली. यावर प्रशांत किशोर यांना पक्षाने सल्लागार म्हणून नेमल्याची आपल्याकडे माहिती नाही, अशी हतबलता प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. तसेच लोकांमध्ये मिसळून पक्ष वाढवायचा असतो, अशी मार्मिक टिप्पणी केली. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल, तटकरे विरुद्ध सुनेत्रा व पार्थ पवार यांच्यातील वादात आणखी भर पडली. याच वेळी पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल करताना केलेले ठराव सादर करण्याची नोटीस निवडणूक आयोगाने पक्षाला बजावली आहे. निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीमागेही नेतृत्वातील वादाची किनार असल्याचे मानले जाते.

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीत पक्षांतर्गत धुसफूस सुरू झाली. सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी लगेचच उरकण्यात आला तेव्हापासूनच ही सुरुवात झाली. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्याने त्यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपविली जातील, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण पार्थ पवार यांनी हळूहळू पक्षावर आपली पकड निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले तेव्हापासून पक्षांतर्गत वाद अधिक चिघळू लागला. अजित पवार यांच्या मृत्यूपासून ते सुनेत्रा पवार यांची पक्षाध्यक्षपदी निवड होईपर्यंत निवडणूक आयोगाला करण्यात आलेला पत्रव्यवहार ग्राह्य मानू नये, असे पत्र पक्षाच्या वतीने आयोगाला पाठविण्यात आले. तीच पहिली काडी पडली. कारण हे सरळसरळ प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाला पवार कुटुंबीयांकडून देण्यात आलेले आव्हान होते. निवडणूक आयोगाला पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यादी सादर करण्यात आली. त्यात प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्यापुढे पदांचा उल्लेखच नव्हता. यामुळे कागदोपत्री प्रफुल्ल पटेल हे आता केवळ राज्यसभेतील गटनेते आहेत. त्यांच्याकडे सध्या पक्षात कोणतेही पद नाही. पदाधिकाऱ्यांच्या यादीचा वाद निर्माण झाल्यावर सुनेत्रा पवार यांनी ही प्रशासकीय चूक दुरुस्त केली जाईल, असे जाहीर केले असले तरी अद्याप त्यावर काही बदल झाल्याचे पक्षाच्या नेत्यांना कल्पना नाही. मध्यंतरी सुनेत्रा पवार नवी दिल्लीत गेल्या असता पटेल व तटकरे हे दोघेही त्यांच्या भेटीगाठीपासून दूर राहिल्याने पक्षांतर्गत दरी रुंदावल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पार्थ पवार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी पक्षांतर्गत फारसा बदल झालेला दिसत नाही. त्यातच सुमारे चार हजार कोटींच्या निविदेवरून छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांच्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

पार्थ पवार यांची महत्त्वाकांक्षा

राष्ट्रवादीतील सध्याच्या पक्षांतर्गत कलहास सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जबाबदार धरले जाते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी पक्षाची सूत्रे स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातूनच सध्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जाऊ लागले. प्रफुल्ल पटेल वा तटकरे यांचे पंख छाटण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला. पटेल, तटकरे यांच्याकडे पक्षाची सूत्रे राहिल्यास आपले महत्त्व कमी होईल, हे त्यांचे साधे गणित आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीतील एका संस्थेची मदत घेण्यात आली होती. अरोरा यांची नेमणूक करण्यात पार्थ पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या सल्ल्याने अजित पवारांनी बरेच बदल केले होते. गुलाबी रंगाचे जाकिट अजितदादा परिधान करू लागले होते. या संस्थेला आता दूर करण्यात आले. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीगाठी अलीकडे वाढल्या आहेत. २०२९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय रणनीती आतापासूनच निश्चित केली जात आहे. या दृष्टीने सल्लामसलत सुरू आहे. पक्षांतर्गत वाढीसाठी तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करावे, असा सल्ला किशोर यांनी दिल्याची चर्चा आहे. यामुळेच तटकरे संतापले. त्यांनी राजकीय सल्लागारापेक्षा लोकांमध्ये मिसळणे आवश्यक असते, असा टोला पार्थ पवार यांना लगावला. पार्थ पवार हे राज्यसभेवर निवडून आले. पक्षाचे सरचिटणीस आहेत. पण सामान्य कार्यकर्त्यांशी त्यांचा अजिबात संपर्क नाही. अजित पवार हे किमान कार्यकर्त्यांना वेळ देत असत. पार्थ पवार यांचा नेतेमंडळी व कार्यकर्त्यांशी संवादच नाही. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी काढलेला चिमटा पार्थ पवार यांना चांगलाच लागू होतो. लोकांमध्ये मिसळावे लागते, हे तटकरे यांचे म्हणणे बरोबर आहे. शरद पवार हे आजही कार्यकर्त्यांना भेटतात. त्यांच्याशी संवाद साधतात. नवीन पिढीला वातानुकूलित खोलीत बसूनच पक्षाचा कारभार चालवायचा असतो.

सुनेत्रा पवार यांनाच आव्हान

‘अजित पवार यांच्या पश्चात पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. अशा वेळी पक्ष वाढीसाठी कारभारात सुधारणा आवश्यक आहे’, असे विधान करून प्रफुल्ल पटेल यांनी मध्यंतरी सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिले होते. सुनेत्रा पवार यांनी गेल्या सहा महिन्यांत कशावरच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. तसेच पक्षातील घडामोडींवर भाष्य केलेले नाही. शरद पवार गटाच्या विलीनीकरणावर उलटसुलट चर्चा सुरू असताना त्यांनी त्यावर अवाक्षर काढलेले नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने त्यांचा उल्लेख ‘गुंगी गुडिया’ असा केल्याने वाद निर्माण झाला. पक्षांतर्गत वादामुळे काहीशा अडगळीत पडलेल्या सुनेत्रा पवार यांच्याबद्दल या टिप्पणीने सहानुभूती निर्माण झाली. पण त्याचा फायदा उठविण्यात पक्षाला तेवढे यश मिळालेले नाही. पक्षाचे नेतृत्व करायचे असल्यास सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना पक्षाच्या व्यासपीठावर ठोस भूमिका मांडावी लागेल. पण सध्या तरी दोघांकडून तशी काहीच कृती केली जात नाही.

सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर पक्षातूनच आक्षेप घेण्यात आला. त्यांची निवड झाली ती बैठक चुकीच्या पद्धतीने बोलाविण्यात आली होती, अशी तक्रार पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने निवडणूक आयोगाकडे केली. यामागे पक्षांतर्गत वादाची किनार असल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाने गेल्याच आठवड्यात सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावून संघटनात्मक बदलांबाबतचे ठराव सादर करण्याची सूचना केली आहे.

भाजपचे थांबा आणि वाट बघा

राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत घडामोडींवर भाजपचे बारीक लक्ष आहे. शरद पवार यांचा पक्ष वाढू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवार गटाला सध्या तरी मदत करतील. कारण भाजपला आगामी निवडणुकीत आव्हान नको आहे. ‘विलीनीकरणाचा निर्णय घ्यायचा असल्यास भाजपशी आधी चर्चा करावी लागेल’ असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांचे हे विधान बोलके आहे. भाजपला पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची उपयुक्तता होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत साखर पट्ट्यात भाजपने बऱ्यापैकी जम बसविला आहे. २०२९च्या निवडणुकीतील रागरंग बघूनच भाजप अजित पवार गटाला किती महत्त्व द्यायचे याचा निर्णय घेईल. सध्या तरी राष्ट्रवादीसाठी कालखंड खडतर आहे.