sunetra pawar first emotional post after taking oath as deputy cm : अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील लोकभवन येथे हा कार्यक्रम अगदी साधेपणाने पार पडला. दरम्यान शपथविधी पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांना सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे,” असे सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
“दादांच्या अकाली जाण्याने मनावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन,” असेही पुढे सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
पुढे चालत राहीन….
याबरोबरच सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या विचारांना उजाळा देत पुढे चालत राहू असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, “या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेली प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.”
सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन खाती
अजित पवार यांच्याकडे अर्थ, नियोजन अशी महत्त्वाची खाती होती. अजित पवारांच्या निधनानंतर ही खाती पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मिळावीत अशी अपेक्षा पक्षाला होती. मात्र सध्यातरी असे झाल्याचे सध्यातरी दिसून येत नाहीये. राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती देण्यात आली आहेत. तर अजित पवारांचे नियोजन आणि वित्त हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे.

