उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गदारोळ माजला आहे. काँग्रेसच्या या बोचऱ्या टीकेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र पडसाद उमटत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या सर्व राजकीय वादावर आता खुद्द सुनेत्रा पवार यांनी आपली पहिली आणि अत्यंत मोजक्या शब्दांतील प्रतिक्रिया देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राष्ट्रवादी आक्रमक; काँग्रेस कार्यालयात घोषणाबाजी

काँग्रेसने वापरलेला ‘गुंगी गुडिया’ हा शब्द अत्यंत चुकीचा आणि अपमानास्पद असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या टीकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली आणि तीव्र विरोध नोंदवला.

“अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार निशाना साधला. “काँग्रेसचे लोक चर्चेत राहण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“लोकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने चर्चेत राहण्यासाठी ‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ’ अशी काँग्रेसची मानसिकता झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तरावर जाणारे राजकारण पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या पक्षाच्या टीकेचे समर्थन केले आहे. “या टीकेकडे राष्ट्रवादीने सकारात्मकतेने पाहण्याची गरज आहे,” असे सांगत त्यांनी सुनेत्रा पवार यांना आव्हान दिले.

“दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी ‘गुंगी गुडिया’ म्हणून हिणवले गेले होते. परंतु, त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ते खोटे ठरवले आणि अटलबिहारी वाजपेयींनाही त्यांचे ‘दुर्गा’ म्हणून कौतुक करावे लागले. सुनेत्रा पवारांनीसुद्धा गोंधळ न घालता स्वतःचे कर्तृत्व दाखवून त्या दुर्गा आहेत हे सिद्ध करावे,” असे सपकाळ पत्रकार परिषदेत म्हणाले.

सुनेत्रा पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली?

काँग्रेसने केलेल्या टीकेबाबत माध्यमांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विचारले असता, त्यांनी केवळ पाच शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. “मी वेळ आल्यानंतर उत्तर देईन…” एवढेच सांगत त्या निघून गेल्या. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.