Sunetra Pawar takes charge as NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड होताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित केले. सुनेत्रा पवार म्हणाल्या, “माझ्यासाठी हे केवळ एक पद नाही, तर लाखो कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास माझ्यासाठी मोठी ताकद आहे. पक्ष संघटनेला बळकट करण्यासाठी पूर्ण निष्ठा आणि समर्पण वृत्तीने काम करेल.”
भाषणाच्या सुरुवातीला सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. त्यांचा आवाजही हळवा झालेला होता. मात्र जसे जसे त्या पुढे बोलत गेल्या, तसा त्यांच्या आवाजातील करारी आणि कणखरपण दिसला. राष्ट्रीय कार्यकारिणी असल्यामुळे त्यांनी हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तीनही भाषात संवाद साधला.
शरद पवारांचे एकदाही नाव नाही
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आता केवळ पार्थ आणि जय हेच माझे कुटुंब नाही, तर पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस माझे कुटुंब आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या जबाबदारीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.” राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच आपण पक्षाशी जोडले गेलेलो होतो, हे सांगताना त्यांनी एकदाही शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र शरद पवार यांच्या मातोश्री शारदा पवार यांचे नाव घेतले. आपल्या आजे सासू शारदाताई पवार यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करणार, असे त्या म्हणाल्या.
अजित पवारांची पोकळी भरून निघणार नाही
सुनेत्रा पवार भाषणात म्हणाल्या, आपल्या सर्वांचे आवडते नेते, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून येणे शक्य नाही. अजित पवार नेहमीच महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकरी, युवक-महिलांसाठी आणि पक्षासाठी झटत आले. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांची स्वप्ने अर्ध्यावर राहिली. पण त्यांची स्वप्ने आता आणखी उंचीवर नेण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे.
“अजित पवार आपल्यात नाहीत, हा आघात प्रचंड मोठा असला तरी वास्तव मान्य करायला हवे. यातून आपल्या सर्वांना सावरावे लागेल. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही, तर तो विचार आहे. पक्षाचा विचार पुढे नेण्यासाठी आपल्याला निर्धाराने पुढे जावे लागणार आहे. अजित पवारांची जागा कुणीही भरून काढू शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. पण त्यांनी दाखवलेली वाट, त्यांनी घडवलेला एक एक कार्यकर्ता, त्यांची जिद्द आणि शिस्त हीच खरी राष्ट्रवादीची खरी ताकद आहे”, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

