मुंबई: पत्रकारांना गप्प बसण्यास सांगणारे राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे यांच्या विधानावर शेजारीच बसलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काहीच हरकत न घेतल्याने काँग्रेसकडून समाजमाध्यमांवर पवार यांचा उल्लेख ‘गुंगी गुडीया’ असा करण्यात आला. याविरोधात राष्ट्रवादीनेही आक्रमक भूमिका घेत कुलाबा येथील काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात घुसून गोंधळ घातला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या या टिपणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आक्षेप नोंदवला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यातील एक चित्रफीत काँग्रेसने प्रसारित केली. या चित्रफितीत पत्रकार परिषदेत उपमख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्रकार प्रश्न विचारत असताना राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून रोखत असल्याचे दिसून आले. यावरून सुनेत्रा पवार अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहणार? असा सवाल काँग्रेसने उपस्थित करणारा संदेश समाजमाध्यमात (‘एक्स’वर) प्रसिद्ध केला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत तो महिलांचा अवमान असल्याचा आरोप केला. मंगळवारी गांधी भवनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यालयात घुसले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करत सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागण्याची मागणी केली. तसेच सपकाळ यांच्याकडे समाजमाध्यमातील या विधानावर जाब विचारण्याचाही प्रयत्न केला. यावेळी दोन्ही पक्षांचे समर्थक आमने-सामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
‘गुंगी गुडिया’ हा अपशब्द नाही – सपकाळ
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर आकसापोटी टीका केलेली नसून ‘गुंगी गुडीया’ हा शब्द अपशब्द नाही, शिवी नाही किंवा तो असंसदीय शब्द नाही, असा खुलासा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले गेले होते, पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून आपले कणखर नेतृत्व सिद्ध केल्याने अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना दुर्गा म्हटले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कर्तृत्वातून दुर्गा असल्याचे दाखवून द्यावे, असेही सपकाळ म्हणाले. एक गुंड प्रवृत्तीचा लोकप्रतिनिधी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला गप्प बसवतो, अशावेळी उपमुख्यमंत्री एक शब्दही बोलत नाहीत व पत्रकारांचे प्रश्नही घेत नाहीत, अशावेळी हाताची घडी व तोंडावर बोट ठेवले, म्हणून गुंगी गुडिया हा शब्द वापरला असल्याचे स्पष्टीकरण सपकाळ यांनी दिले. एखाद्या पक्षाच्या कार्यालयात घुसून अशा पद्धतीने भ्याड हल्ला करण्याचा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. आरे ला कारे म्हणता येते, पण काँग्रेस पक्ष गांधीचा मार्ग सोडणार नाही. सांगून आले तर संविधान देऊन त्यांचे स्वागत केले असते, असे सपकाळ म्हणाले.
काँग्रेसची संस्कृती बिघडली – देवेंद्र फडणवीस
काँग्रेस खालच्या स्तरावर उतरली आहे. त्यांना कोणीच विचारत नसल्याने बातम्यांमध्ये येण्यासाठी अशापद्धतीने ते काम करीत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तरावर जाणारे हे आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.
तमाम माता-भगिनींचा अवमान – एकनाथ शिंदे
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचा आणि लाडक्या बहिणींचा अपमान आहे. काँग्रेसने निदान जनाची तरी बाळगायला हवी. महिलांच्या सन्मानाच्या नावाने राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा खराचे चेहरा महाराष्ट्राने पाहिला आहे. राजकीय विरोध करा, पण महिलांचा अपमान करून राजकारण करण्याची ही काँग्रेसची संस्कृती आहे का, असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
