महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधान परिषदेत शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. इराण इस्रायल युद्धामुळे परिणाम झाला असून राज्याला गॅस टंचाईचा सामना करावा लागतो आहे असं विधान काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीही महत्त्वाची घोषणा केली आहे. आपण जाणून घेऊ दिवसभरातली महत्त्वाची ५ वक्तव्यं.

सोशल मीडियावर बदनामी केल्यास कारवाई, समिती नेमली जाणार-मुख्यमंत्री

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करुन कुठल्याही पुराव्याविना बदनामी करणं हे खूप प्रमाणात वाढलं आहे. समाजातल्या सगळ्याच लोकांना त्याचा सामना करावा लागतो. महिलांना तर विशेष करुन जास्त सामना करावा लागतो. त्यामुळे यासंदर्भात कायद्यात काही बदल किंवा तरतूद करता येईल का? यासाठी आम्ही डीजींच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली जाईल आणि पुढील कारवाई केली जाईल. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची घोषणा

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मी अत्यंत महत्त्वाची घोषणा करत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. Come early Go early याची घोषणा करत आहोत. त्यानुसार, मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९.१५ वाजता कार्यालयात आल्या तर घरी जाताना त्यांना अर्धा तास लवकर सोडण्यात येईल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. सरकारने लाडकी बहीण, लेक लाडकी, अन्नपूर्णा सारख्या योजना आपण आणल्या आहेत. मेट्रोमनी साईड वरून होणारी फसवणूक रोखण्यासाठी देखील कायदा करण्याबाबत प्रयत्न केले जातील. लाडकी बहीण योजना प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील १७ हजार अंगणवाडीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही सुनेत्रा पवार यांनी दिली.

केंद्र सरकारकडून इंधनाचं नियोजन व्यवस्थित नाही त्यामुळे टंचाई, भाई जगताप यांचा आरोप

मागचे ११ दिवस इराण–इस्रायल युद्ध सुरू आहे, त्यामुळे आपल्या राज्यालाही अडचणींचा सामना करावा लागतो आहे असं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलं आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या अडचणींमुळे अनेक व्यावसायिक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. युद्ध सुरू असल्याची माहिती सरकारला आहे, त्यामुळे त्यानुसार नियोजन केले पाहिजे. सामान्य लोकांना यामुळे हाल होऊ नयेत अशी अपेक्षा आहे. मात्र केंद्र सरकारचं नियोजन अपयशी ठरतं आहे असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.

घरगुती गॅसचा तुटवडा पडू देणार नाही-छगन भुजबळ

घरगुती गॅसचा तुटवडा होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरची कमतरता भासू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. काही हॉटेल मालक आम्हाला भेटायला आले होते त्यांनीही तेच सांगितलं की गॅस पुरवठा बंद केला तर आमचं नुकसान होईल. पूर्ण पुरवठा बंद करु नका, २५ टक्के बंद करा अशी विनंती त्यांनी केली. ही मागणीही मी मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडर वापरावर मर्यादा येतील याची कल्पना मी मुख्यमंत्र्यांना दिली. ते म्हणाले की मी याबाबत केंद्राशी चर्चा करतो अशी माहिती आज छगन भुजबळ यांनी दिली.

खामेनींच्या हत्येवर एक शब्दही न बोलणं ही षंढांची शांतता आहे- संजय राऊत यांची टीका

सध्या आपला देश भयंकर संकटातून जातो आहे. युद्ध जरी इराण, इस्रायल, अमेरिका आणि अन्य राष्ट्रांमधलं असलं तरीही त्याच्या ज्वाळा आपल्या देशापर्यंत पोहचल्या आहेत. कारण या सगळ्याचा फटका महागाई आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतींचा भडका, शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. भारताची या बाबतची भूमिका नेमकी काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका काय आहे? हे देशाला समजलं पाहिजे. सरकारला राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा घडू द्यायची नाही असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे. आम्ही शांततेच्या बाजूने आहोत असं जे सांगत आहेत तर मी त्यांना हे सांगू इच्छितो की याला षंढांची शांतता म्हणतात. युद्ध भारताच्या सीमेवर आलं आहे. मोदी हे युद्धाच्या दोन दिवस आधी इस्रायलला जाऊन आले. खामेनींच्या मृत्यूनंतर साधा शोकही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला नाही. याचा अर्थ या सरकारची शांतता ही षंढांची शांतता आहे.