उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेत रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, रुग्णालयातील स्वच्छतेची स्थिती, औषधांचा पुरवठा आणि रुग्णालयातील एकूण व्यवस्थापनाची माहिती सुनेत्रा पवार यांनी घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांशी देखील संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि तेथील समस्या जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना चांगलंच झापलं आहे. रुग्णालयात काही ठिकाणी अस्वच्छता दिसून आल्याने सुनेत्रा पवार यांनी रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट दिल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रुग्णालयातील अस्वच्छता पाहून सुनेत्रा पवार तेथील कर्मचाऱ्यांवर चांगल्याच संतापल्या असल्याच पाहायला मिळत आहे . “अशी स्वच्छता असते का? दिवसभर तुम्ही काय काम करता? फक्त मोबाईल पाहता का?”, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना झापलं आहे.
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालय प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील अनेक वार्डामध्ये जाऊन स्वच्छतेचा आढाव घेतला असता अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याचं दिसून आलं. रुग्णालयातील एवढी अस्वच्छता पाहून सुनेत्रा पवार यांनी तेथील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच झापलं आहे.
‘तुम्ही दिवसभर काय करत असता?…’
“तुम्ही सर्वजण आता लगेच कामाला लागा. तुम्हाला हा कचरा कचराकुंडीत टाकायला त्रास होतो का? तुम्हाला जास्त काम असतं का? ही अशी स्वच्छता असते का? तुम्ही दिवसभर काय करत असता? फक्त मोबाईल पाहता का? हे येथे ओषधे पडलेत, काय आहे हे? स्वच्छता कशाला म्हणतात? तुमचं नाव काय आहे? ये या सर्वांची नावं लिहून घ्या. हे तात्काळ स्वच्छता करायला सांगा. या कर्मचाऱ्यांना काही काम नाही का, त्यांच्याकडे आयकार्ड दिसत नाहीत. आम्हाला अनेक रुग्णांच्या तक्रारी आलेल्या आहेत”, अशा कडक शब्दांत सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना झापलं आहे.
