Sunetra Pawar Life Threat SIT Complaint: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीला मिळालेल्या तक्रारीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बीडमधील एका व्यक्तीने एसआयटीला पत्र पाठवून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षांकडून जीवाला धोका असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. या पत्रावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
अशोक खरात प्रकरण बाहेर आल्यानंतर राज्याच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला होता. तसेच त्यांच्याकडील महिला संघटनेचे प्रमुखपदही काढून घेण्यात यावे, असा दबाव पक्षाअंतर्गत आणि विरोधकांकडून वाढू लागल्यानंतर चाकणकर यांनी महिला संघटनेच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. या सर्व घडामोडी घडल्यानंतर बीडमधील एका व्यक्तीने सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी तक्रार केली आहे.
तक्रारीच्या वैधतेबाबत अद्याप अस्पष्टता
दरम्यान ही तक्रार खरी आहे की खोटी? याची खातरजमा होऊ शकलेली नाही. ही तक्रार राजकीय हेतून प्रेरित आहे का? किंवा कुणीतरी खोडसाळपणा केला, याचा तपासही आता एसआयटीकडून केला जाणार आहे. मात्र या तक्रारीची मुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांनी दखल घेतली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
पुण्यामध्ये जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पूर्ण काळजी राज्याचे पोलीस खाते घेईल. महाराष्ट्राच्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केली आहे. जे काही पत्र मिळाले आहे, त्याचीही जरूर चौकशी केली जाईल.
अशोक खरातच्याही जीवाला धोका?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनाही या पत्राबद्दल प्रश्न विचारण्यात आला. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्या म्हणाल्या की, राज्यात काय चालू आहे, याचा कुणालाही थांगपत्ता लागत नाही. असे जर पत्र आले असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असेल तर अशोक खरातच्या जीवालाही मोठा धोका असू शकतो, असे मला वाटते. हे प्रकरण मिटवण्यासाठी कदाचित खरातला संपवले जाऊ शकते, असाही संशय दमानिया यांनी व्यक्त केला.
सुनेत्रा पवार यांनी सावध राहावे – शिरसाट
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे) नेते संजय शिरसाट यांनाही या प्रकरणाबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला. त्यावर ते म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका आहे की नाही, याचा तपास पोलीस करतील. पण त्यांनी सावध राहिले पाहिजे, हे नक्की. राजकारणात जेव्हा एखादी महिला महत्त्वाच्या पदावर जाते, तेव्हा त्यांना संकटाचा सामना करावा लागतो, हे अनेकदा आपण पाहिले आहे. चौकशीतून सत्य येईलच, पण सुनेत्रा पवार यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे.
