महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची कोणतीही कल्पना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना नव्हती अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत काय घडतंय? याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. या घडामोडींवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सविस्तर भाष्य केलं. ‘प्रत्येक भेटीची माहिती ही सुनेत्रा पवार यांना असेलच असं नाही’, अशी प्रतिक्रिया दत्तात्रय भरणे यांनी दिली. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दत्तात्रय भरणे काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात नेमकं काय घडतंय? याबाबत बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, “खरं तर सर्वांचा काहीतरी गैरसमज होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा पक्ष हा एकसंध आहे. आमचा पक्ष हा भक्कम आणि मजबूत आहे. तुम्ही मला विचारलं की, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. मात्र, सार्वजनिक जीवनात प्रत्येक भागातील आणि प्रत्येकाची कामे असतात. त्यामुळे प्रत्येकजण मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. आता मी देखील कृषीविभागाची काही कामे असतील तर थेट मुख्यमंत्र्यांना भेटत असतो. मग तेव्हाही सुनेत्रा पवार यांना कल्पना असतेच असं नाही. मग याचा अर्थ दुसऱ्या पक्षातील नेत्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना भेटणं यात काही चुक आहे असं मला वाटत नाही”, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.

सुनेत्रा पवार यांनी तातडीने एक बैठक बोलवली होती, त्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी त्या भेटीबाबत खंत व्यक्त केल्याची चर्चा आहे. या प्रश्नावर बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, “त्याबाबत मलाही काही माहिती नाही. सुनेत्रा पवार यांचीही काही चूक नाही. कारण ते (सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल) त्यांच्या वैयक्तिक कामांसाठी फडणवीसांच्या भेटीसाठी गेले असतील किंवा सार्वजनिक कामांसाठी गेले असतील. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणं यात काहीही चुकीचं नाही.”

राष्ट्रवादीत सर्वकाही अलबेल आहे का?

तुमच्या राष्ट्रवादी पक्षात सर्वकाही अलबेल आहे का? की कुठे नाराजी आहे? यावर बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, “आमच्या पक्षात कुठेही नाराजी नाही. आता एक गोष्ट असते की कुठेही बारीकसारीक गोष्टी सुरू असतात. मग याचा अर्थ आमच्यामध्ये नाराजी आहे असं नाही. एकमेकांच्या विचारांमध्ये फरक असतो, तसेच एकमेकांच्या कामांमध्येही फरक असतो. अनेकदा काही गैरसमज देखील असतात. मात्र, एकत्र आल्यानंतर गैरसमज दूर होत असतात. अजित पवार यांनी हा पक्ष वाढवला आहे, आजही आम्हाला वाटतं की अजित पवार आमच्यात आहेत. पण आमचा पक्ष भक्कम आहे”, असं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे.