राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची कोणतीही कल्पना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना नव्हती अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात नेमकं काय घडतंय? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

या घडामोडींवर आता खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं कारण काय? या भेटीची माहिती सुनेत्रा पवार यांना होती का? मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बरोबरच्या भेटीत काय चर्चा झाली? याबाबत सुनील तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही, आम्ही सर्व राजकीय भेटींबाबत सुनेत्रा पवार यांना कल्पना देत असतो’, असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत सुनील तटकरे काय म्हणाले?

सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीवरून चर्चांना उधाण आलं होतं. आता या भेटीबाबत सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. तटकरे म्हणाले की, “मी आणि प्रफुल पटेल आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. आमचे काही वेगळे विषय होते, त्यावर आमची काही चर्चा झाली. त्यानंतर प्रफुल पटेल यांना परदेशात जायचं होतं, त्या प्रमाणे ते गेले.”

सुनेत्रा पवार याबाबत अनभिज्ञ होत्या का?

देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तुमची भेट झाली, त्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ होत्या अशा चर्चा आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर तटकरे म्हणाले की, “हा प्रश्न पक्षांतर्गत आहे. त्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. सुनेत्रा पवार या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्यांच्या माहितीकरता ज्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे, ती माहिती आम्ही नियमितपणे त्यांना सांगत असतो. आमचा संवाद अतिशय उत्तम आहे. अजित पवार यांच्याबरोबर गेले ३५ वर्ष अतुट नातं राहिलेलं आहे. त्यांच्याशीही आमचा उत्तम संवाद होता. तरीही आम्ही काय करत आहोत हे अजित पवारांना सहजपणे समजत होतं. आता अशाच पद्धतीचा संवाद सुनेत्रा पवार यांच्याबरोबर आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज कोणाच्या मनामध्ये असण्याचं काही कारण नाही. त्यांनी बोलावून घेतलं आणि भेटीचं कारण विचारलं असा कोणताही भाग नाही”, असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं कारण काय?

“आमच्या पक्षाच्या बैठकीत देखील अनेक विषयांवर चर्चा झाली. आता मी खासदार आहे, त्यामुळे माझ्या मतदारसंघातील अनेक कामे असतात. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक भेट घेतली म्हणजे ती राजकीय भेट असते अशातला काही भाग नाही. माझ्या मतदारसंघातील काही प्रस्ताव आहेत, ते राज्य सरकारच्या माध्यमातून दिल्लीला पाठवायचे आहेत. त्यामुळे अशा वेळेला प्रत्येक गोष्ट कोणाला ज्ञात असणं किंवा सांगणं हे अभिप्रेत नाही. पण जेव्हा राजकीय विषय असतो किंवा पक्षाच्या निगडीत विषय असतो, तेव्हा आम्ही एकमेकांशी चर्चा करत असतो. जेव्हा राजकीय कारणांसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो, तेव्हा त्याची कल्पना सुनेत्रा पवार यांना असते. तसेच भेटीनंतर जो तपशील असतो, तो तपशील सुनेत्रा पवारांना सांगितला जातो. मी अनेक वर्षांपासून राजकारणात आहे, त्यामुळे मलाही राजशिष्टाचार माहिती आहे. आमच्या पक्षात अविश्वास हा विषय आहे असं मी कधी ऐकलेलं नाही”, असंही सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.