Sunetra Pawar NCP National President Appointment Update: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठी फेरबदल करण्यात आले असून सुनेत्रा पवार यांच्याकडे आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एनसीपी) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पदासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची या पदावर नियुक्ती होणे निश्चित मानले जात होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज वरळी डोम येथील सभागृहात पार पडली. यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्व सदस्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला. यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याचे प्रफुल पटेल यांनी जाहीर केले.

प्रफुल पटेल यांनी यावेळी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांच्या नेतृत्वाविषयी बोलताना पटेल म्हणाले, ज्या प्रकारे एखादा सेनापती सैन्याच्या पुढे उभा राहून नेतृत्व करतो, त्याप्रमाणे अजित पवार सर्व निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचे नेतृत्व करत होते. त्यामुळेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगल्या संख्येने आमदार निवडून आले.

अजित पवार यांच्या पश्चात पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता होती. मध्यंतरी प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा होती, पण त्यांनी या चर्चांना फेटाळून लावले. सर्व कायेदशीर प्रक्रिया पूर्ण करूनच निवड केली जाईल, असे पटेल यांनी स्पष्ट केले होते. सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी सर्व नेतेमंडळी ठाम उभी राहणार असून, पक्ष बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले होते.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात म्हणाले, “अजित पवारांच्या गैरहजेरीत राष्ट्रीय अधिवेशन पार पाडण्याची दुर्दैवी वेळ नियतीने आपल्यावर आणली. एक वलयांकित नेतृत्व म्हणून अजित पवारांकडे राज्य आणि देशाने पाहिले. आजवर त्यांना जी काही भूमिका सरकारमध्ये मिळाली, ती त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे पूर्ण केली. २००४ साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ७३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला, त्यात सर्वात मोठे योगदान अजित पवारांचे होते.”