मुंबई : महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीशी कोणतीही तडजोड केली नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.

अजित पवार यांनी पहिला अर्थसंकल्प हा एक लाख ४४ हजार कोटी रुपये खर्चाचा सादर केला होता. त्यांचा शेवटचा अर्थसंकल्प सात लाख २० हजार कोटी रुपये खर्चाचा होता. ही राज्याची प्रगती आहे, असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

अर्थसंकल्पापूर्वीचा चहापान कार्यक्रम हा केवळ एक कार्यक्रम नाही. तो संवादाचा मंच आहे. विरोधकांनी या मंचावर येऊन जनतेचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे. गेल्या पंधरा वर्षात राज्याचा वाढलेला अर्थसंकल्प हे प्रगतीचे धोतक आहे. राज्याच्या जनतेने मोठया विश्वासाने महायुतीला सत्ता दिली आहे. या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करेल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

विरोधकांनी सभागृहात प्रश्न मांडावेत – एकनाथ शिंदे

हे केवळ सत्ताधाऱ्यांचे अधिवेशन नाही, विरोधक आणि सत्ताधारी ही रथाची दोन चाके आहेत, त्यांनी सरकारच्या चहानापावर बहिष्कार घातला. पण त्यांच्याच बैठकीवर सहकाऱ्यांनी बहिष्कार घातला. संवादाचा अभाव असल्याने तसे झाल्याचे त्यांनी सांगितले असले, तरी हा राज्यसभा निवडणुकीचा परिणाम आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

विरोधक सत्ताधाऱ्यांचे काळे धंदे बाहेर काढू असे म्हणतात. त्यांचे अडीच वर्षातील काळे धंदे कधीही बाहेर काढता येतील. पूर्वीच्या सरकारने केलेले अडीच वर्षाचे काम आणि महायुती सरकारने केलेले साडेतीन वर्षाचे काम जनतेने पाहिले आहे. विरोधकांना जनतेने नाकारले आहे आणि विकासाला स्वीकारले ही वस्तुस्थिती आहे. सरकारने एकच चांगले काम नाही तर हजार चांगली कामे केलेली आहेत. सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून प्रश्न सोडवण्यापेक्षा सभागृहात विरोधक बोलतील तेवढे लोकांच्या प्रश्न सुटतील, असा सल्ला शिंदे यांनी दिला.

सरकार विरोधकांचा अपमान करीत नाही. विरोधी पक्षनेत्याचा निर्णय हा अध्यक्ष व सभापती घेतात. राहुल गांधी देशाचा अपमान परदेशातही करतात आणि आता देशातही करीत आहेत हा देशद्रोह आहे. आम्ही जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.