कराड : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कोणत्याही महत्वपूर्ण कार्याचा माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या कराडच्या समाधीस्थळी अभिवादन करून सुरुवात केली होती. हे आमचे शक्तिस्थळ असून, येथून प्रेरणा घेण्यास येत असल्याचे ते सांगत. यशवंतरावांचे स्मृतीस्थळ अन् कराडशी त्यांचा ॠणानुबंध जुळला होता. आज हीच परंपरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही जोपासली. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर या आपल्या नव्या अन् आव्हानात्मक वाटचालीस सुरुवात करणाऱ्यापूर्वी आज सोमवारी सुनेत्रा पवार यांनी यशवंतरावांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून त्या नतमस्तक झाल्या.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ठीक १० वाजता येणार होत्या. आणि त्या अजित पवारांप्रमाणे वेळचे जणू बंधन पाळत दहाच्या ठोक्याला येथे दाखल होत्या. यापूर्वीच अगदी सकाळपासून पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पवार कुटुंबाचे स्नेहीही दाखल झाले होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी सुनेत्रा पवार येताच नेते व कार्यकर्त्यांचा जणू गराडा पडला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठनेते, पवार परिवाराचे जुने स्नेही श्रीनिवास पाटील व त्यांचे कुटुंब समोर येताच सुनेत्रा पवार भावूक झाल्या.
सुनेत्रा पवार यांनी यशवंतरावांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार नितीन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, उदयसिंह पाटील- उंडाळकर, विक्रमबाबा पाटणकर, बाळासाहेब सोळसकर, संजय देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे नातेही अत्यंत जिव्हाळ्याचे होते. ते वारंवार येथे येत असत. माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या कराडच्या प्रीतिसंगमावरील स्मृतीस्थळाशी अजित पवार यांचा ॠणानुबंध जुळला होता.
ज्येष्ठ्नेते शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांना राजकीय गुरु मानत असल्याने त्यांच्या जयंती व स्मृतीदिनी कराडमध्ये त्यांच्या समाधीस पुष्पांजली वाहण्यास ते आवर्जून हजर राहत असत. पण, त्यात अलीकडे प्रकृतीच्या कारणास्तव अनेकदा खंड पडला. परंतु, काकांची ही परंपरा अजित पवारांनी कायम जोपासली. आताही सुनेत्रा पवार याही पवार कुटुंबाची ही परंपरा पुढे नेत असल्याने याची सर्वत्र एकच चर्चा होत आहे.
पवार परिवाराचे या भूमीशी वैचारिक, राजकीय व भावनिक नाते जोडले गेलेले आहे. येथील जनतेनेही त्यांना भक्कम ताकद दिल्याने पवार आणि यशवंतरावांचे स्मृतीस्थळ असा जिव्हाळ्याचा संगम बनला आहे. आणि हीच परंपरा कायम राहत असल्याची चर्चा दिसून येत आहे.

