लोकसभा निवडणुकांचे निकाल देशात आणि महाराष्ट्रात वेगळी समीकरणं निर्माण करणारे ठरल्याचं मानलं जात आहे. केंद्रात आणि राज्यातही भाजपाप्रणीत आघाड्यांना फटका बसल्याचं निकालांवरून स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालांकडे पाहिलं जात असतानाच आता राज्यसभेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्याचवेळी छगन भुजबळांचंही नाव चर्चे आहे. राज्यसभा निवडणुकीच्या चर्चांवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक पोस्ट केली आहे.

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या चालू असून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ यांची नावं चर्चेत आहेत. यांच्यापैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? यावर तर्क-वितर्क चालू आहेत. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी एक्स हँडलवर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. मात्र, या पोस्टचा रोख नेमका कुणाकडे आहे? हे त्यातून स्पष्ट होत नाहीये.

काय आहे रोहित पवार यांच्या पोस्टमध्ये?

रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये राज्यसभा उमेदवारीचा उल्लेख करतानाच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची नावंही घेतली आहेत. मात्र, पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातील विश्वासू व्यक्तीला ती दिली तर टिकेल, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांनी नेमका टोला कुणाला लगावला आहे? यावरून तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

“शरद पवारांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं, तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील, हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. त्यामुळे पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली, तरच ती टिकेल. इतरांचा काही भरवसा नाही अशी चर्चा चालू आहे”, असं रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पराभवाचे खापर आमच्यावर नको; ‘ऑर्गनायझर’मधील लेखावर राष्ट्रवादीची भूमिका

दरम्यान, या पोस्टच्या शेवटी रोहित पवारांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. “..म्हणूनच सुनेत्राकाकी किंवा पार्थ यांना आधीच शुभेच्छा आणि अभिनंदन”, असं रोहित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याप्रमाणेच पार्थ पवार यांचाही अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी विचार होतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.