Sunetra Pawar seeks Uddhav Thackeray’s support : बारामती पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या राजकारणात वेगवान हालचाली सुरू आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली. या जागेसाठी पोटनिवडणूक लागली असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, या जागेवरून बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून प्रयत्न केले जात असताना काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. अशातच सुनेत्रा पवारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असल्याची चर्चा आहे. यावर संजय राऊतांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

बिनविरोध निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे स्वतः बोलतील

“उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल उद्धव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केली. बारामती पोट निवडणुकीविषयी ती चर्चा होती. महाराष्ट्रात बारामती पोटनिवडणुकीवर सर्वांचं लक्ष आहे. पक्षप्रमुखांशी त्यांनी त्यासंदर्भात केली. ती चर्चा काय झाली, त्यासंदर्भात काय निर्णय आहे, तो लवकरच स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन संवाद साधतील, असं संजय राऊत म्हणाले.

“अजित पवार हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि निकटचे सहकारी होते. त्यामुळे मला वाटतं की (बिनविरोध निवडणुकीसंदर्भात) उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतील. सुनेत्रा पवारांचा पक्ष महाविकास आघाडीत नाही. तो भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. काँग्रेस जर वेगळा निर्णय घेणार असेल तर त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून लक्ष घातलं पाहिजे. पण उद्धव आणि अजित पवारांचं भावनिक नातं होतं. त्यामुळे ते जे निर्णय घेतील त्याबाबत ते स्वतः बोलतील”, असं संजय राऊत आज माध्यमांना म्हणाले.

“काँग्रेस पक्ष चर्चा करत आहे. उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. पण याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सगळे निर्णय आघाडी म्हणून एकत्र चर्चा झाल्यावर निकाल बाहेर येईल”, असंही ते म्हणाले. “काँग्रेस देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. भाजपाबरोबर असलेल्या पक्षाला मदत होऊ नये म्हणून ते निर्णट घेत असतील. पण आम्ही चर्चा करू’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली

“बिनविरोध निवडणुकीबाबत सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. आता त्यांनी काँग्रेसबरोबर चर्चा केली हे मला माहिती नाही. पण भाजपाने अनेक पोटनिवडणुकांमध्ये उमेदवार दिले आहेत. भावना फक्त आम्हालाच आहेत. पुण्यात आश्विनी जगताप यांच्याविरोधात अजित पवारांनी नाना काटे हे उमेदवार दिले होते,असंही त्यांनी सांगितलं.