Sunil Raut Replied To Jp Nadda : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेना संपत आलेला पक्ष असल्याचं म्हणत देशात केवळ भाजपा पक्ष राहणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जे पी नड्डा म्हणजे देशाचे गॉडफादर आहेत का? प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.

काय म्हणाले सुनील राऊत?

”जे. पी. नड्डा हे देशाचे गॉडफादर आहेत का? ते म्हणतील आणि शिवसेना संपेल असं होतं नाही. त्यांच्यात शिवसेना संपवायची हिंमत नाही. काही आमदार, खासदार पळवून नेल्याने पक्ष संपत नसतो. जोपर्यंत शिवसैनिक आहेत आणि उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत, तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. जे ईडीला घाबरून गेले, त्यांना पश्चाताप होईल. राज्यपाल जे बोलले, त्यावर या आमदारांपैकी कोणीही बोललं नाही. कारण हे सर्व भाजपाच्या दबावाखाली आहे, अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली आहे.

हेही वाचा – “शिवसेना संपत आलेला पक्ष”, भाजपा अध्यक्ष नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुख्यमंत्र्यांनाही दिले प्रत्युत्तर

संजय राऊतांच्या अटकेनंतर सकाळी ८ वाजता भोंगा बंद झाला, असे वक्तव्य मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यालाही सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ”एकनाथ शिंदे म्हणाले, भोंगा बंद झाला. मात्र, गेली अडीच वर्ष याच भोंग्याच्या भरवश्यावर ते मंत्री होते. भोंगा बंद झाला असता, तर तुम्ही आज घरी बसला असता”, अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली.

“’सामना’ तसाच निघेल”

संजय राऊत यांच्या अटकेनंतर सामनाच्या अग्रलेखाचं काय होईल? असा प्रश्न पत्रकांनी विचारल्यानंतर ”गेला ३० वर्षात जसा सामना निघत होता, तशात ठणठणीत निघेल. देशाचं लक्ष सामनावर असतं. देशभरात ‘सामना’ निघतो, असंही ते म्हणाले.

हेही वाचा – “जे.पी. नड्डा असे म्हणालेले नाहीत” भाजपा अध्यक्षांच्या ‘त्या’ विधानानंतर फडणवीसांचे स्पष्टीकरण

जे. पी. नड्डा नेमकं काय म्हणाले होते?

देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपाच राहणार असं विधान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केले होते. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो, तर देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असं ते म्हणाले होते. शिवसेना संपत आलेला पक्ष असल्याचाही उल्लेखही त्यांनी केला होता. ”भाजपाच्या विरोधात लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष आज शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई कुटुंबवाद आणि घराणेशाहीविरोधात आहे. विचारधारेवर चालणारा एकमेव पक्ष असल्याने फक्त भाजपाच राहणार, असा दावाही त्यांनी केला होता.