भाजप सोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार हे आग्रही होते. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. ते मावळमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. एकीकडे अजित पवारांकडून मतदारसंघासाठी निधी घ्यायचा आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधात बंड करायचं हे उपद्वाप रोहित पवारांनी थांबवावेत असा घनाघात देखील त्यांनी केला आहे. २२ जून २०२२ रोजी मंत्रालयात अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी रोहित पवार देखील होते असं शेळके यांनी म्हटल आहे त्यामुळे शेळके यांच्या या आरोपांवर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार काय उत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं आहे.
सुनील शेळके म्हणाले, कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र यावेत अशी भावना रोहित पवार यांची नाही. ज्यांनी राष्ट्रवादी सोबत बंड करून शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले त्यांना आम्ही आगामी काळात धडा शिकवू असं म्हणत आहेत. त्यांना मला एक सांगायचय… २२ जून २०२२ रोजी मंत्रालयात अजित पवारांसोबत झालेली बैठक, मग त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत झालेली चर्चा…की, आपण भाजपसोबत जाऊ, सत्तेत सामील होऊ हे सांगण्याकरता आम्ही ज्यांच्या सोबत गेलो. त्यात सर्वात पहिले रोहित पवार होते. आपण सत्तेमध्ये राहिलं पाहिजे. सत्तेशिवाय पर्याय नाही. सत्तेत राहिलो तर आपल्या मतदारसंघातील कामे होतील. हे शरद पवार यांना भेटून सांगू हे सांगण्यासाठी आम्ही सर्व नवनिर्वाचित आमदार गेलो होतो.




हेही वाचा >>>गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलीसांकडून रोप वाटप
असा गौफ्यस्फोट शेळके यांनी केला. पुढे ते म्हणाले, आता रोहित पवार सांगतात की पक्षाचे विचार घेऊन चालू ते पक्षाचे विचार नाही. ते त्यांचे स्वतःचे विचार आहेत. एकीकडं अजित पवारांकडून निधी घेऊन जायचा आणि त्यांच्याच विरोधात बंड करायचा हा उपद्व्याप रोहित पवारांचा सुरू केला आहे. पक्ष म्हणून आपण सर्वजण एकत्र कसे येऊ यासाठी त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आम्ही सर्व नवनिर्वाचित आमदार अजित पवार यांना भेटलो आपण सत्तेत राहिलं पाहिजे तरच आपल्या मतदारसंघातील कामे होतील अस त्यांना सांगितलं. अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं, की शरद पवार यांच्या परवानगीशिवाय मी निर्णय घेणार नाही. मग, रोहित पवार यांनी नवनिर्वाचित आमदारांना घेऊन शरद पवार यांची भेट घेतली. तेव्हा आम्ही सत्तेत सहभागी होण्यासाठी त्यांना विनंती केली होती. अस देखील त्यांनी म्हटलं.