Sunil Shetty Dahi Handi news : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने ठाण्यातील ‘संकल्प प्रतिष्ठान’च्या दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. गेल्या अनेक वर्षांपासून या सोहळ्याला येत असल्याने त्यांनी आयोजक रवींद्र फाटक यांचं कौतुक केलं. “मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, म्हणूनच मी अभिमानाने मराठीत संवाद साधतो” असं वक्तव्यही त्याने यावेळी केलं.

माध्यमांशी मिश्कीलपणे बोलताना सुनील शेट्टी म्हणाला, “हे रवीभाऊंचे मंडळ नसून मीच त्यांना वर्षानुवर्षे येथे बोलावतो! केवळ दहीहंडीच नाही, तर गणेशोत्सवासाठीही मी ठाण्यात येतो. येथील सर्व धार्मिक सण अतिशय उत्तम पद्धतीने साजरे केले जातात.”

‘सुरक्षिततेची काळजी घेऊन रेकॉर्ड करा’

दहीहंडीतील थरांच्या स्पर्धेबाबत विचारलं असता तो म्हणाला, “दहीहंडी हा एक खेळ आहे. एकमेकांना सांभाळून आणि सहकार्य करून हा खेळ खेळण्याची गरज आहे. मी मुंबईतच लहानाचा मोठा झाल्याने दहीहंडीचा अनुभव घेतला आहे; पण आता वय झाल्याने ती ताकद राहिलेली नाही. तरीही, रवीभाऊ खाली उभे राहणार असतील, तर मी थरावर चढायला तयार आहे!”

यंदा १० थरांचा विक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर बोलताना सुनील शेट्टीने गोविंदांना आवाहन केलं, “विक्रम जरूर करा, आपल्यात ती क्षमता आहे. मात्र, रेकॉर्ड करताना कोणालाही दुखापत होणार नाही किंवा हाडे मोडणार नाहीत, याची पूर्ण काळजी घ्या.”

मराठी भाषेबद्दल आदर

कोणत्याही कार्यक्रमात आवर्जून मराठीत बोलण्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता सुनील शेट्टी म्हणाला, “मुंबई माझी कर्मभूमी आहे आणि मुंबईने मला सर्व काही दिलं आहे. त्यामुळे मी मराठी बोललंच पाहिजे. मी माध्यमांना मराठीत मुलाखती द्यायला थोडा घाबरतो, पण माझ्या कर्मचाऱ्यांशी नेहमी मराठीतच बोलतो. त्याची मला चांगली सवय आहे.”