राहाता: माझी जन्मभूमी कर्नाटक असली तरी माझी कर्मभूमी मुंबई आहे. मी इथे काम करतो, इथे मी वाढलोय. त्यामुळे मला मराठी येणं गरजेचं आहे. मला मराठी शिकायची आहे आणि मराठी बोलायची आहे, असे हिंदी चित्रपटातील अभिनेता सुनील शेट्टी याने म्हटले आहे. सध्या राज्यात हिंदी सक्तीवर वादंग उठलेले असताना त्याने मराठीत बोलून आश्चर्याचा धक्का देत मराठी भाषेबद्दल प्रेम व्यक्त केले.
अभिनेता सुनील शेट्टी याने सोमवारी साई मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शेट्टी म्हणाला, की पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील कलाकारांना भारतात बंदी घालावी, अशी ठाम भूमिका मी पहिल्यापासूनच घेत आहे. मी सुरुवातीपासून म्हणतो की, ज्या लोकांमुळे आपल्या देशाला त्रास होतो. अशा लोकांशी कोणतेही संबंध ठेवू नयेत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील कलाकारांना भारतात बंदी घातली पाहिजे. जोपर्यंत भारत-पाकिस्तानमधील वातावरण शांत होत नाही, तोपर्यंत केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर क्रिकेट, राजकारण, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये पाकिस्तानशी संबंध तोडले पाहिजेत.
आज अनेक दिवसांनंतर साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. दरवर्षी साईंच्या दर्शनासाठी येत असतो. मात्र मध्यंतरीच्या काळात साईबाबांचे बोलावणं आले नव्हते. माझी पत्नी वर्षातून दोनवेळा शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येते. आज साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन मनाला समाधान वाटले. लवकरच सहपरिवार साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहे, असे सुनील शेट्टी याने सांगितले. साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी शेट्टी याचा सत्कार केला.