Sunil Tatkare Advice Dhananjay Munde: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्रकार परिषदेत त्यांच्याच पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी बोलू दिले नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियावर सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले गेले. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घुसखोरी करत जोरदार घोषणाबाजी केली होती. आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही काँग्रेसला खडे बोल सुनावले. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बोलू न देणाऱ्या धनंजय मुंडे यांनाही त्यांनी सल्ला दिला.

काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी

“उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असे संबोधन करून काँग्रेसने आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे. मी या टिप्पणीचा निषेध करतो. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. काल रात्री काँग्रेसने दिलगिरी व्यक्त केल्याची पोस्ट माझ्या निदर्शनास आली. पण केवळ दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नसतो. काही वेळेला काय बोलावे, याचे भान ठेवावे लागते. दुर्दैवाने काँग्रेसचे राज्यातील नेतृत्व हे विसरल्यासारखे दिसत आहे”, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली.

धनंजय मुंडेंना दिला सल्ला

सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच त्या बीडमध्ये पालकमंत्री म्हणून शासकीय दौऱ्यासाठी आल्या होत्या. अशावेळी त्यांना प्रश्न विचारला असता दुसऱ्या नेत्याने त्यांना थांबवणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तटकरे म्हणाले, “पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना जिल्ह्यातील आमदार बाजूला बसतात, त्यात काही गैर नाही. पण पत्रकार परिषद मुख्य नेत्याची असते. त्यामुळे इतरांनी त्यात मधे बोलण्याचे कारण नाही.”

बीड जिल्ह्यातील पत्रकार परिषदेत नेमके काय झाले? हे मी समजून घेईल. मी पूर्ण व्हिडीओ पाहिलेला नाही. पण मुख्य नेत्याची पत्रकार परिषद होत असताना त्यात भाग घेणे योग्य नाही, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले.

“उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ४० वर्षांपासून सामाजिक जीवनात कार्यरत आहेत. त्यांनी कला, क्रीडा, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले आहे. अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतर त्यांनी ज्याप्रकारे परिस्थितीला सामोरे जाण्याचे धाडस दाखवले ते अतुलनीय आहे. त्यानंतर राजकारणात ज्या काही घटना घडत आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला कुठेतरी कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न आहे”, अशीही टीका सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.

नेमके प्रकरण काय?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यातील एक चित्रफीत काँग्रेसने प्रसारित केली. या चित्रफितीत पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्रकार प्रश्न विचारत असताना राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून रोखत असल्याचे दिसून आले. यावरून सुनेत्रा पवार अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहणार? असा सवाल काँग्रेसने उपस्थित करणारा संदेश समाजमाध्यमात (‘एक्स’वर) प्रसिद्ध केला होता.

सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. काँग्रेसने केलेल्या टीकेबाबत माध्यमांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विचारले असता, त्यांनी केवळ पाच शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. “मी वेळ आल्यानंतर उत्तर देईन…” एवढेच सांगत त्या निघून गेल्या. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.