महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. महाराष्ट्रावर या बातमीने शोककळा पसरली. २९ जानेवारीला अजित पवारांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तर ३१ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या या शपथविधीबाबत प्रश्न उपस्थित झाले. इतक्या घाईने शपथविधी का पार पडला? हा त्यातला प्रमुख प्रश्न होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रश्नावर आणि विलीनीकरणावर भूमिका मांडली आहे.
विलीनीकरणाच्या चर्चांवर काय म्हणाले सुनील तटकरे
विलीनीकरण हा शब्द कधी आला नव्हता. निवडणूक एकत्र लढणं हा एक भाग आणि विलीनीकरण हा दुसरा भाग. आत्ता येणाऱ्या निवडणुकांमध्येही एकत्र लढायचं असं दादा मला म्हणाले होते. आत्ता जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्यावर एक सांगेन की अजित पवारांच्या मनात १०० टक्के विश्वास होता की ते जे बोलतील त्याबाबत सुनील काही म्हणणार नाही. तारीख वगैरे ठरली होती अशा चर्चा आहेत पण लॉजिकल एंडला या चर्चा आल्या नव्हत्या असंही सुनील तटकरे यांनीही म्हटलं आहे. अजित पवारांच्या निधनानंतर ज्या काही चर्चा सुरु झाल्या त्यानंतर आम्ही नेता निवडीची प्रक्रिया सुरु केली. पण त्याला विरोध का झाला? उपमुख्यमंत्री निवडणं याचा अर्थ आम्ही विलीनीकरणाच्या विरोधात आहोत असं का चित्र निर्माण केलं जातं आहे?
नेता निवडणं आणि उपमुख्यमंत्री निवडणं यावर आक्षेप का?
आमचा नेता निवडणं आणि उपमुख्यमंत्री निवडणं यावर आक्षेप का घेतला गेला? असा प्रति प्रश्न सुनील तटकरेंनी विचारला आहे. सुनेत्रा पवारांचा शपथविधी घाईने झाला का? यावर विचारलं असता तटकरे म्हणाले, विलीनीकरण हा वेगळा विषय झाला. उपमुख्यमंत्रिपद आणि विधीमंडळ नेता निवडीत इतरांचा अधिकार काय? घाई का हा प्रश्नच का विचारला जातो? अजित पवारांची इच्छा काय होती? २०१९ ला ते भाजपासह गेले होते. ८० तासांचं सरकारही झालं होतं. दादांची इच्छा काय होती? दोन पक्षांचं सरकार स्थिर राहिल. २०२२ मध्येही ठरलं होतं की सगळे आमदार म्हणाले होते की भाजपासह गेलं पाहिजे. मी त्याच्या तपशीलांमध्ये जात नाही असंही सुनील तटकरेंनी म्हटलं आहे. मुंबई तक या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुनील तटकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.
अजित पवारांची काय आठवण सुनील तटकरेंनी सांगितली?
अजित दादांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकली आणि मी कोसळलो. माझे वडील गेले तेव्हा जेवढं दुःख झालं त्यापेक्षा कैकपटीने जास्त दुःख मला झालं. अजित पवार अशा पद्धतीने जातील असं वाटलं नव्हतं. त्यांच्या आठवणी अनेक आहेत. अजित पवार मला एक मित्र म्हणून, दिलदार नेता म्हणून, मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे नेते म्हणजे अजित पवार होते. मागच्या ३५ वर्षांत आम्ही एकमेकांना साथ दिली. मैत्रीला जागणारे दादा, कुटुंबवत्सल दादा, टापटीप ठेवणारे दादा अशी त्यांची अनेक रुपं मी पाहिली आहेत. त्यांनी जुनी गाणी खूप आवडत ऐकायचे. त्यांच्या कारमध्ये गाणी लावलेलीच असत. किशोर कुमार यांची गाणी त्यांना आवडत असत अशी आठवण सुनील तटकरे यांनी सांगितली.

