Sunil Tatkare On NCP Alliance : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक घडामोडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा देखील सुरू असून याबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांना विलिनीकरण हवं होतं अशी भूमिका मांडली जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून त्याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्याचं चित्र दिसत आहे.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पहिल्यांदाच मोठी भूमिका मांडली. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास तुमची सहमती असेल का? या प्रश्नावर बोलताना सुनील तटकरे यांनी सूचक भाष्य केलं. ‘जर आणि तरच्या प्रश्नावर आज मी काहीही भाष्य करणार नाही, पण जेव्हा अशी परिस्थिती येईल तेव्हा पक्ष सामूहिक रित्या त्याबाबत विचार करेल’, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.
सुनील तटकरे काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. जर असं झालं तर तुम्हाला ते मान्य असेल का? या प्रश्नावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “जर आणि तरच्या प्रश्नावर आज मी काहीही भाष्य करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक राजकीय भूमिका घेऊन आणि अजित पवार यांच्या विचाराने आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अशावेळी जर किंवा तर याचं उत्तर मी आज देऊ इच्छित नाही. ज्या-ज्या वेळी जशी परिस्थिती उद्धभवेल तेव्हा पक्ष सामूहिक रित्या त्या संदर्भातला विचार नक्की करेल”, असं सुनील तटकरे म्हणाले.
विलिनीकरणानंतर कुणाला उपमुख्यमंत्री व्हायचे होते का?
सुनील तटकरे म्हणाले, “शरद पवार गटच्या एका नेत्याने दावा केला की, ते पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांबरोबर त्यांची कोणत्या टप्प्यावर काय काय चर्चा झाली हे ते जाहीर करणार आहेत. त्यांनी जाहीर केल्यानंतर आम्ही त्यावर बोलू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला नेता निवडणे आणि त्याला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देणे आणि विलिनीकरण करणे, हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. विलिनीकरणानंतर दुसऱ्या कुणाला उपमुख्यमंत्री व्हायचे होते का? वारंवार याची चर्चा का केली जात आहे?”, असा उलट सवाल सुनील तटकरे यांनी उपस्थित केला.
राष्ट्रीय अध्यक्षाचा विषय कधी मार्गी लागणार?
अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय मार्गी लागल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? हा प्रश्न पक्षासमोर आहे. याबाबत प्रश्न विचारला असताना सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत प्रफुल पटेल आणि मी वारंवार भूमिका व्यक्त केलेली आहे. आमदार आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेईल. संघटनेच्या बाबतीतले निर्णय लवकरात लवकर घेतले जातील.”

