नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. तटकरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांचा ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला. सुनील तटकरे यांना ५ लाख ८ हजार ३५२ मतं मिळाली. तर अनंत गीते यांना ४ लाख २५ हजार ६६८ मतं मिळाली. अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन या चार विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांना मताधिक्य मिळालं. तर दापोली आणि गुहागर या रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदारसंघात अनंत गीते आघाडीवर राहीले. अलिबाग आणि पेण या दोन मतदारसंघात मिळालेल्या लक्षणीय मताधिक्यामुळे तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. दरम्यान, अलिबागमध्ये आम्हाला काँग्रेसचंही सहकार्य मिळालं असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे.

सुनील तटकरे म्हणाले, निवडणुकीच्या काळात सांगितलं जात होतं की, अलिबाग विधानसभा मतदारसंघात मी २ ते ५ हजार मतांनी पिछाडीवर राहीन. काही लोकांनी या परिसरात अपप्रचार केला, माझ्याविरोधात वातावरणनिर्मिती केली. परंतु, आमदार महेंद्र दळवी, भाजपा नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी मेहनत घेतली. तसेच काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांनी आम्हाला मदत केली. या सर्वांच्या बळावर मला २०१९ च्या निवडणुकीपेक्षा यंदा जास्त मतं मिळाली. अलिबाग मतदारसंघातही याआधीच्या निवडणुकीपेक्षा मला अधिक मतं मिळाली. यदाच्या निवडणुकीत मला फार चांगलं यश मिळालं.

दरम्यान, तटकरेंच्या दाव्याने महाविकास आघाडीच्या चिंता वाढल्या आहेत. कारण या निवडणुकीत काँग्रेसने मविआच्या उमेदवाराऐवजी महायुतीच्या उमेदवाराला मदत केली असेल तर त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होऊ शकतो.

या मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. यात १० लाख ९ हजार ५६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी ५०.१७ टक्के मतं सुनील तटकरे यांना मिळाली. तर अनंत गीते यांच्या पारड्यात ४३ टक्के मतं पडली.

विधानसभा मतदारसंघसुनील तटकरेअनंत गीतेमताधिक्य
पेण१,१२,९९५६६,०५९४६,९३६ (तटकरे)
अलिबाग१,१२,६५४७३,६५८३८,९९६ (तटकरे)
महाड७७,८७७७४,६२६३,२५१ (तटकरे)
श्रीवर्धन८६,९०२५७,०३०२९,८७२ (तटकरे)
दापोली६९,०७१७७,५०३८,४३२ (गीते)
गुहागर४७,०३०७४,६२६२७,५९६ (गीते)

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तटकरे यांनी प्रसारमाध्यमांसी बातचीत केली होती. यावेळी ते म्हणाले होते, महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक जिंकली असली तरी विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा पराभव करू. बारामतीत अजित पवार दीड लाख मतांनी जिंकणार आहेत. बारामतीची जनता सुज्ञ आहे. अजित पवारांनी गेल्या 30 वर्षात या मतदारसंघात खूप कामं केली आहेत,

हे ही वाचा >> “मला ते अपमानास्पद…”, छगन भुजबळांनी मांडली व्यथा; लोकसभेचं तिकीट न मिळण्याचं कारण सांगत म्हणाले…

महायुतीच्या पराभवाचं कारण काय?

“एनडीएने ४०० पारचा नारा दिला आणि ते तो नारा आमच्या अंगलट आला”, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार तटकरे म्हणाले, मुख्यमंत्री जे काही म्हणाले ते त्यांच्या दृष्टीने कदाचित बरोबर असू शकतं, आम्हालाही तसं वाटतं. ४०० पारचा नारा दिल्यानंतर विरोधकांनी संविधानाबाबत लोकांच्या मनात शंका उपस्थित केली, त्यासाठी अप्रचार केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले.