राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलून राष्ट्रवादीने राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. राज्यसभेसाठी संधी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यानंतर भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधत नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी एक सूचक भाष्य केलं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमकं कुणाकडे? याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

“मी नाराज नाही, नाराज काय होणार? पण इतरांना जो न्याय मिळाला तोच न्याय मलासुद्धा मिळाला पाहिजे अशी मागणी माझी होती”, असं म्हणत ‘मै कबड्डी का खिलाडी हू, शतरंज का खिलाडी नही’, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. “छगन भुजबळ हे मला उद्देशून बोलले असतील असं मला वाटत नाही”, असं सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

सुनील तटकरे काय म्हणाले?

छगन भुजबळ यांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, “छगन भुजबळ हे कबड्डीचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. पण तरीही बुद्धिबळ कसं खेळावं याची देखील माहिती भुजबळांना नक्कीच आहे. कारण भुजबळ हे भुजबळ आहेत. त्यामुळे त्यांच्या स्टाईलने त्यांना जे सांगायचं असतं ते सांगत असतात”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

“आता ते असं बोलले की इतरांच्या मुलाबाळाला जो न्याय मिळाला, तोच न्याय मला मिळाला पाहिजे वैगेरे…, त्यांचं हे वक्तव्य मला उद्देशून आहे किंवा ते (भुजबळ) मला उद्देशून असं बोलले असतील असं मला वाटत नाही. त्यांचं ते वक्तव्य मी माझ्यावर अजिबात घेणार नाही. मात्र, तरीही जर सांगायचं झाल्यास मी जनतेमधून निवडून आलेलो आहे. माझी मुलगी देखील जनतेमधून निवडून आलेली आहे. आता अनिकेतची निवड देखील जनतेमधूनच झालेली आहे. फक्त निवडणूक बिनविरोध झाली हा भाग वेगळा. त्यामुळे छगन भुजबळ यांचं हे वक्तव्य मला उद्देशून असेल असं मला वाटत नाही”, असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं.

“माझे आणि छगन भुजबळ यांचे गेल्या ३५ वर्षांपासूनचे अतिशय चांगले संबंध आहेत. छगन भुजबळ यांचा स्वभाव हा आक्रमक आहे आणि हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मात्र, आजचं त्यांचं वक्तव्य हे आक्रमकतेचं धोतक नव्हतं. त्यांनी एक पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला असेल”, असंही सुनील तटकरे म्हणाले आहेत.

‘राजकीय पक्ष सर्वांचं समाधान करू शकत नाही’

छगन भुजबळ यांचं एक वक्तव्य असं होतं की सगळ्यांना जो न्याय मिळेल तोच न्याय मला मिळेल अशी अपेक्षा होती, याबाबत पत्रकारांनी पुन्हा विचारलं. यावर सुनील तटकरे म्हणाले की, “एक गोष्ट खरी आहे की कुठलाही राजकीय पक्ष सर्वांचंच समाधान करू शकत नाही. एखादी जागा असेल तर त्या ठिकाणी इच्छुकांची संख्या जास्त असणं स्वभाविक आहे. तसेच याबाबत कोणी अपेक्षा ठेवत असेल तर अपेक्षा ठेवणं देखील चूक नाही”, असं तटकरे म्हणाले.

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

“भाजपाकडे माझा प्रस्ताव मांडल्यानंतर निर्णय घेण्यासाठी शेवटचा एक दिवसच उरला होता. त्यावर भाजपाकडून असं उत्तर आलं की, ज्यावेळी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा त्याचा विचार करु. त्यामुळे भाजपाने माझा प्रस्ताव नाकारला, यामध्ये तथ्य नाही. मी नाराज नाही. इतरांना जो न्याय मिळाला, इतर लोक राज्यसभा, लोकसभेवर आहेत, त्यांची मुलबाळं मंत्री आहेत, मी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यापासून पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मलासुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे, ही माझी मागणी होती”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.

‘हम शतरंज के खिलाडी नही है’ : भुजबळ

तुमच्यावर अन्याय झाला आहे का? असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, “चालायचंच. आज नाही तर कल, कल नही तो कल…, मैं कबड्डी का खिलाड़ी हूं, शतरंज का नहीं”, असं सूचक भाष्य छगन भुजबळ यांनी केलं होतं.

दरम्यान, छगन भुजबळ हे राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र, राज्यसभेवर जाण्याकरिता त्यांनी स्वत:चं मंत्रिपद समीर भुजबळ यांना देण्याची अट ठेवली होती. पण, भाजपाकडून त्याला ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावरही भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राजेंद्र जैन यांनी काय प्रतिक्रिया दिली होती?

राजेंद्र जैन यांनी राज्यसभेचा अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना उमेदवारीसाठी पक्षाचे आभार मानले आहेत. “छगन भुजबळ मला वडिलांसारखे आहेत. त्यांचे अनेकवेळा मला आशीवार्द लाभले आहेत. आमच्या पक्षात नाराजीचा प्रश्नच नाही. तसेच, पक्षात कोणताही सुप्त संघर्ष नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यना, राजेंद्र जैन हे राष्ट्रवादीचे पूर्व विदर्भातील एक प्रमुख नेते म्हणून ओखळले जातात. प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे त्यांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या जैन यांनी भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्या संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत आमदार म्हणून काम केलेलं आहे.