राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ६ दिग्गज नेत्यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील व धनंजय मुंडे या नेत्यांचा सहभाग होता. या भेटीचे फोटोही समोर आले. मात्र, या भेटीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार हे दिसले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या सहा नेत्यांनी अमित शाहांची भेट का घेतली? भेटीचं कारण काय? या भेटीत काय चर्चा झाली? सुनेत्रा पवारांना डावलून या नेत्यांनी ही भेट घेतलीय का? अर्थखात्याची मागणी की पक्षातील अंतर्गत कलह? असे अनेक सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात आले.

दरम्यान, यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची कोअर कमिटीची बैठकही पार पडली. कोअर कमिटीच्या या बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत कोअर कमिटीच्या बैठकीत काय घडलं? अमित शाहांच्या भेटीत काय चर्चा झाली? पक्षात नाराजीनाट्य सुरू आहे का? अशा विविध मुद्यांवर महत्वाचं भाष्य केलं. ‘आमच्यात नाराजीनाट्य असण्याचं कोणतंही कारण नाही’, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच आमच्या विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक बोलावण्यात आल्याचंही तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

सुनील तटकरे काय म्हणाले?

“आज आम्ही या बैठकीत प्रदीर्घ चर्चा केली. त्यामुध्ये दुष्काळ व त्या संदर्भातील समस्या आणि पक्षाच्या उद्याच्या दिवसातील काही कार्यवाही, उद्या आमच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावलेली आहे. त्या अनुषंगाने पक्ष संघटना व विधिमंडळाचे आमचे सदस्य अशा सर्व विषयांवर आम्ही चर्चा केली. पक्षाच्या कामकाजाबाबतही आम्ही चर्चा केली. एकसंघपणे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम कसं करता येईल या पार्श्वभूमीवर आम्ही चर्चा केली”, असं सुनील तटकरेंनी सांगितलं.

पक्षात नाराजीनाट्य सुरू आहे का?

पक्षात नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा आहे. तसेच पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे? या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले की, “दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्यांवर याआधीच पडदा पडलेला आहे. याबाबत शरद पवार यांच्या पक्षाकडून देखील भूमिका मांडण्यात आलेली आहे. आम्ही देखील याबाबत भूमिका स्पष्ट केलेली आहे, बाकी आमच्या पक्षात नाराजीनाट्य असण्याचं काहीही कारण नाहीये. मात्र, पक्ष आणि पक्षाचं संघटन व पक्षाचे वेगवेळे कार्यक्रम, याबाबत आम्ही नक्कीच चर्चा केली. कारण आम्ही सर्वजण संघटनेतील कार्यकर्ते आहोत”, असं तटकरे म्हणाले.

अमित शाहांबरोबर काय चर्चा झाली?

अर्थखात्याबाबत काही निर्णय झाला आहे का? याबाबत काय चर्चा झाली? या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले की, “अर्थखात्याबाबतचा निर्णय नक्कीच होईल. कालच्या (शाह यांच्या बरोबरच्या) आमच्या बैठकीत देखील आमच्या पक्षाच्या ज्या भावना आहेत, त्या आम्ही मांडलेल्या आहेत”, असं सुनील तटकरे म्हणाले.

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षाची उद्या बैठक, कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी एक महत्वाची माहिती सांगितली. उद्या (मंगळवारी) आमच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली असून त्या अनुषंगानेही पक्ष संघटना आणि विधिमंडळातील सदस्य याबाबत आम्ही चर्चा केली, असंही सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांनी शाहांची भेट घेतली?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ६ दिग्गज नेत्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील व धनंजय मुंडे या नेत्यांचा सहभाग आहे. या भेटीचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेने एक्सवर (ट्विटर) शेअर केले आहेत.

सुनेत्रा पवारांना डावलून NCP च्या नेत्यांनी शाहांची भेट घेतली?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील व धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार हे दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना डावलून अमित शाहांची भेट घेतली आहे का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

अमित शाहांच्या भेटीबाबत पक्षाने काय स्पष्टीकरण दिलं?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या सहा ज्येष्ठ नेत्यांची भेट झाल्यानंतर पक्षात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून, ही भेट आधीच निश्चित झालेली होती, असं स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याच्या आणि पक्षात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याच्या बातम्या पूर्णपणे असत्य, बिनबुडाच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत,” असं उमेश पाटील यांनी स्पष्ट केलं.