Sunil Tatkare On Supriya Sule : अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) अध्यक्षपदी आज बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाला. प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावावर सर्व सदस्यांनी हात वरती करून पाठिंबा दिला आणि सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड झाली.

या कार्यक्रमात सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. ‘अजित पवार यांच्याबाबत काय-काय बोललं गेलं, दुधवाला पण सकाळी ६ ला उठतो, पेपरवालाही सकाळीच उठतो, अशा प्रकारे अजित पवारांना हिणवलं गेलं’, असं म्हणत सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्ष टीका केली.

सुनील तटकरे काय म्हणाले?

“२००४ मध्ये जर सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून तेव्हा निर्णय घेतला गेला असता तर महाराष्ट्राने अजित पवार यांच्या रुपाने सर्वोत्तम मुख्यमंत्री अनुभवला असता. पण यापासून महाराष्ट्राची जनता मुखली आहे. त्यानंतर अनेक घडामोडी होत गेल्या. एखादं नेतृत्व जेव्हा ताकदवान होत जातं तेव्हा स्वाभावीकपणे टीका होत असते. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभरात विस्तारला. त्यांची पक्षावर पकड चांगली होत गेली तेव्हा त्यांच्यावर टीका टिप्पणी झाली. अजित पवार यांना प्रचंड मनस्ताप झाला. पण मी अजित पवार यांचा एक सहकारी म्हणून सुनेत्रा पवार यांचे ऋण व्यक्त करतो”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.

“२०१२ पासून ते आजपर्यंतच्या कालावधीत अजित पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होत असताना सुनेत्रा पवार यांनी सावली सारखी साथ दिली. त्यामुळे अजित पवार यांचा उत्तराधिकारी होण्याचा मान, सन्मान हा फक्त सुनेत्रा पवार यांचाच आहे. २०२३ मध्ये जेव्हा अजित पवार यांना वाटलं की मी एकाकी आहे. तेव्हा कोण होतं? तेव्हा प्रफुल पटेल, छगन भुजबळ, मी (सुनील तटकरे), हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे होते. तेव्हा अजित पवारांनी काही कारणांसाठी मी एका भूमिकेपर्यंत जात आहे ही भूमिका घेतली. तेव्हा आम्ही सर्वांनी सांगितलं होतं की दादा तुम्हीच आमचे नेते आहात. त्यानंतर आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला”, असं सुनील तटकरे म्हणाले.

सुनील तटकरेंची शरद पवार गटाच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका

“आता अलिकडच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने बोलण्याचं काम होतंय. लोकसभेच्या निवडणुकीनंतर सांगण्यात आलं की अजित पवार यांचं महाराष्ट्रात काही चालणार नाही. तेव्हा मी एक वाक्य बोललो होतो की महाराष्ट्रात ‘अजित पर्व’ सुरू होतंय. तेव्हा माझ्यावर अनेकांनी टीका केली. लोकसभेच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांना पराभव पत्कारावा लागला. आजही अनेक वेगवेगळ्या प्रकारची भाषा केली जाते. अजित पवार यांच्या कामाची सुरुवात सकाळी ६ ला होत असे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती होतं. पण त्याबाबत काय बोललं गेलं? दुधवाला पण सकाळी ६ ला उठतो, पेपरवालाही सकाळीच उठतो, अशा प्रकारे अजित पवार यांना हिणवलं गेलं”, अशी अप्रत्यक्ष टीका सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांवर केली.