Sunil Tatkare On Ramdas Kadam : अजित पवारांच्या अकाली निधनानंतर चार दिवसांतच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, यावरून शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. ‘अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं आणि शरद पवारांना शह देण्यासाठी त्यांनी सुनेत्रा पवारांना लगेच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली’, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला आता सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं. ‘तुम्ही मातोश्री सोडताना आम्ही विचारलं का?’, असा टोला तटकरेंनी कदमांना लगावला.

सुनील तटकरे काय म्हणाले?

रामदास कदम यांनी केलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “रामदास कदम यांनी जे वक्तव्य केले आहेत, त्याबाबत मी जास्त काही बोलू इच्छित नाही. कारण दगड चिखलात मारणं म्हणजे आपल्याच अंगावर चिखल उडवणं. त्यामुळे त्यांना टीका करायची तर करू द्या. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकीत ४१ जागांवर आम्ही यश मिळवलं. त्यामुळे आमच्या पक्षाचा एखादा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे. आता रामदास कदमांनी मातोश्री का सोडली? त्यानंतर इतरांची साथ का धरली? हा त्यांचा प्रश्न आहे, आम्ही कधी त्याबाबत काही विचारलं का?”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

सुनेत्रा पवारांना अर्थखातं का मिळालं नाही? सुनील तटकरेंचं भाष्य

सुनेत्रा पवारांना अर्थखातं का मिळालं नाही? याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊतांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आज सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “याबाबत बोलण्याचा संजय राऊत यांना काय अधिकार आहे? आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. त्या संदर्भातील निर्णय आम्ही करू. उद्या शिवेसना ठाकरे गट या पक्षात कोणाला काय करायचं? याचा सल्ला देण्याचा आमचा अधिकार नाही आणि आम्ही कधी त्या विषयांवर बोलत नाही. संजय राऊतांनी त्यांची प्रकृती लक्षात घेता दुसऱ्यांच्या पक्षात डोकावण्याचं काहीही कारण नाही”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेणार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून विलिनीकरणाबाबत वेगवेगळे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. यावर सुनील तटकरे म्हणाले की, “हसन मुश्रीफ जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आम्ही सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू. १० तारखेला मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी (सुनेत्रा पवार) तेथे येतील, तेव्हा या विषयावर नक्कीच चर्चा करू. कदाचित मग त्या दिल्लीतही येऊ शकतील. राष्ट्रपती महोदयांची भेट, पंतप्रधानांची भेट, राज्यसभेच्या त्या सदस्या आहेत, त्या संदर्भातील ज्या संवैधानिक जबाबदार्‍या आहेत… आम्ही योग्य वेळेला बसून त्याबद्दल निर्णय करू.”