अलिबाग – रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. माणगाव सत्र न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे.  मंगेश काळोखे हत्या प्रकरणात थोरवे यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा दावा करण्यात आला आहे.

खोपोली नगर पालिका निवडणुकीनंतर शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती शिवसैनिक मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर  शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एका खाजगी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना थोरवे यांनी सुनील तटकरे यांना लक्ष्य केलं होतं.

या संदर्भात सुनील तटकरे यांनी माणगाव सत्र न्यायालयात थोरवे यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे.  ६५ कोटींचा दावा नुकताच दाखल झाला आहे. यात महेंद्र थोरवे यांच्यासह एक खाजगी वृत्तवाहिनी, आणि गुगल यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. काल शुक्रवारी यासंदर्भातील पहिली सुनावणी पार पडली, सर्व प्रतिवादींना न्यायालयाने समन्स बजावले आहे. सुनावणीची पुढील तारीख २४ एप्रिल ठेवण्यात आली आहे, अशी माहिती सुनील तटकरे यांचे वकील ॲड. प्रदीप पाटील यांनी सांगितले.