Sunil Tatkare makes an emotional appeal for Sunetra Pawar in Baramati byelection intent : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र, असे असतानाच काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आकाश मोरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा मावळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, सर्वच राजकीय पक्षांना मी आवाहन केलं आहे की, निवडणूक बिनविरोध व्हावी. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी संपर्क करण्याचा प्रयत्न प्रफुल पटेल आणि मी देखील केला. त्यांच्या मनात असेल नसेल तरी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करूया. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आपण सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया.

पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, कदाचित निवडणूक लादलीच गेलीच तर तमाम बारामतीकरांना एवढीच विनंती आहे. जसं १९९१ ला दादा लोकसभेत निवडून आले. १९९१ च्या अखेरीसच विधानसभेला आले. १९९५, १९९९,२००४, २००९, २०१४, २०१९, २०२४ अशा सलग आठ निवडणुका दादा बारामती विधानसभेतून निवडून आले. या निवडणुका लढताना ते नेहमी सत्तेवरती होते असं नाही. १९९५ ला जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली, तेव्हा राज्यात सत्तांतर झालं. १९९९ ची निवडणूक झाल्यानंतर दादांसाठी एक वेगळं आव्हान निर्माण केलं गेलं होतं. पण त्यांचं मताधिक्य प्रत्येक निवडणुकीत चढत्या क्रमानं गेलं.

फक्त शेवटच्या सभेला या

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामती येथे एक शेवटची सभा घ्यायचे, याची आठवण सुनिल तटकरेंनी यावेळी काढली. ते म्हणाले की, “दादा अर्ज भरण्यासाठी बारामतीत यायचे, उरलेले सगळे दिवस महाराष्ट्रातील पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांचा पराकाष्ठा करायचे. निवडणुक जर यदाकदाचित लादलीच गेली तर, वहिनीसाहेब आपण आज अर्ज भरा आणि जशी दादा शेवटची सभा घ्यायचे तसे शेवटच्या सभेलाच आपण या”

मी बारामतीकरांना विनंती करतो की,आपल्या दिवंगत नेतृत्वाला श्रद्धांजली कशी असेल तर, अर्ज भरल्यानंतर शेवटच्या दिवशी वहिनीसाहेब येथे येतील या देशातील विधानसभेच्या निवडणुकीत जितक्या विक्रमी मतांनी कोणी विजयी झालं नसेल तितक्या विक्रमी मताधिक्याने वहिनी निवडून आल्याच पाहिजेत, ही भावनिक साद दादांचा सहकारी म्हणून मी करत आहे, असेही तटकरे म्हणाले.