मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती, बऱ्याच दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर ही पहिलीच भेट असण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून पवार यांची तब्येत ठीक नसल्यामुळे भेटीसाठी त्यांची वेळ मागितली होती. आज त्यांनी वेळ दिल्यामुळे भेट घेतली. आजच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकाळी राष्ट्रीय कार्यकारिणी बाबत केलेले टिव्ट किंवा पक्षातील फुटीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले काम पुढे सुरू ठेवू, असेही तटकरे यांनी म्हटले आहे.
देशात स्थैर्य निर्माण करा – शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी नागरिकांना काटकसरीचे आवाहन केले, त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्रात आणि गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक घेऊन, तज्ज्ञांची बैठक घेऊन नागरिकांना विश्वास देऊन देशात स्थैर्य निर्माण करण्याची गरज आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली आहे.
पश्चिम आशियाई देशातील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकांना काटकसरीचे आवाहन केले आहे. ही बाब काळजी निर्माण करणारी आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय – प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.
सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत करून निर्णय घेण्याची गरज आहे. त्यासह देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घेऊन पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम मागणी आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.
सत्ताधाऱ्यांनी त्याग करावा – जयंत पाटील
आजवर पंतप्रधानांनी केलेले प्रत्येक आवाहन मध्यमवर्गीयांनी कर्तव्य म्हणून पाळले. आता पेट्रोल, डिझेल आणि गॅस कमी वापरण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. मध्यमवर्ग कर्तव्य म्हणून याही वेळेला साथ देईल. पण राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार डझनभर गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात. पंतप्रधानांचा आदेश शीर्ष मानून सत्ताधाऱ्यांनीही राष्ट्र प्रथम हे धोरण कृतीत उतरवावे. ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली आहे.
