Sunil Tatkare on NCP : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगतेय. या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “दोन पक्ष एकत्र होणार असल्याच्या चर्चेवर मी वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने आमची भूमिका स्पष्ट केली आहे.

तटकरे म्हणाले, “आम्ही पक्षातील सर्वच प्रमुख नेत्यांनी म्हणजेच प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील, मी, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ या सर्वांनी मिळून सामूहिकपणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीएत) सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही याच मतावर ठाम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात राहू”. ते एबीपी माझाशी बोलत होते.

आम्ही आमच्या विचारधारेशी सुसंगत असं काम करत राहणार : तटकरे

सुनील तटकरे म्हणाले, “आमच्या मूळ विचारधारेशी एकनिष्ठ राहून, त्यावर ठाम राहून आम्ही एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर जनतेने आम्हाला बहुमत दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कधी नव्हे ते इतक्या प्रचंड बहुमताने विजय मिळवला. आम्ही ५९ पैकी ४१ जागा जिकंल्या. निवडणुकीत आमचा ७१ टक्के स्ट्राइक रेट होता. आमची एनडीएबरोबर जाण्याची भूमिका होती. यावरच आम्ही आजही ठाम आहोत. भविष्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करत राहणार आहे. आम्ही आमच्या विचारधारेशी सुसंगत असं काम करत राहणार आहोत. अशा स्थितीत कोणी आम्हाला जॉईन व्हायचं, किंवा नाही व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी त्याबद्दल अधिक बोलायची आवश्यकता नाही”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांच्या पक्षात इनकमिंग?

खासदार तटकरे म्हणाले, “राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रमुख राजकीय नेते आहेत. विधीमंडळात दीर्घकाळ काम केलेले नेते, संघटनेत व मंत्रिमंडळात काम केलेले सहकारी आहेत, जे अजित पवार यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होत आहेत. काहीजण संपर्कात आहेत. आणखी काहीजण संपर्क साधू पाहात आहेत. लवकरच त्यावर निर्णय होतील”.