Sunil Tatkare On Sunetra Pawar : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण व अल्पसंख्याक विकास ही तीन खाती देण्यात आली. मात्र, अजित पवारांकडे असलेलं अर्थ खातं सुनेत्रा पवार यांच्याकडे सध्या तरी देण्यात आलेलं नाही. त्यामुळे यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्यांवरून टीका केली. सुनेत्रा पवारांना अर्थखातं का देण्यात आलं नाही? याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान, संजय राऊत यांच्या याच वक्तव्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं भाष्य केलं. ‘महायुतीमध्ये भाजपा आणि आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेस) एनडीएचे घटक पक्ष आहोत. त्या संदर्भातील निर्णय आम्ही करू’, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
सुनेत्रा पवारांना अर्थखातं का मिळालं नाही? याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊतांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आज सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “याबाबत बोलण्याचा संजय राऊत यांना काय अधिकार आहे? आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. त्या संदर्भातील निर्णय आम्ही करू. उद्या शिवेसना ठाकरे गट या पक्षात कोणाला काय करायचं? याचा सल्ला देण्याचा आमचा अधिकार नाही आणि आम्ही कधी त्या विषयांवर बोलत नाही. संजय राऊतांनी त्यांची प्रकृती लक्षात घेता दुसऱ्यांच्या पक्षात डोकावण्याचं काहीही कारण नाही”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेणार? सुनील तटकरे स्पष्टच बोलले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून विलिनीकरणाबाबत वेगवेगळे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. आमदार रोहित पवार यांनी १२ फेब्रुवारीला या पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाबाबत काय बोलणी झाली, तसेच इतर माहिती देणार आहेत. यादरम्यान आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचेही महत्त्वाचे विधान केले आहे. सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर आम्हाला विलिनीकरण करावेच लागेल, असेही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
सुनील तटकरे म्हणाले की, “हसन मुश्रीफ जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आम्ही सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू. १० तारखेला मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी (सुनेत्रा पवार) तेथे येतील, तेव्हा या विषयावर नक्कीच चर्चा करू. कदाचित मग त्या दिल्लीतही येऊ शकतील. राष्ट्रपती महोदयांची भेट, पंतप्रधानांची भेट, राज्यसभेच्या त्या सदस्या आहेत, त्या संदर्भातील ज्या संवैधानिक जबाबदार्या आहेत… आम्ही योग्य वेळेला बसून त्याबद्दल निर्णय करू.”

