Rohit Pawar On Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले. अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना न कळवता पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला.

रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर आता खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ‘या महाभागालाच पक्ष ताब्यात घेण्याची घाई झाली आहे’, असं म्हणत सुनील तटकरे यांनी रोहित पवारांचा अप्रत्यक्ष डोमकावळा असा उल्लेख केला आहे.

सुनील तटकरे काय म्हणाले?

“अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या पक्षाच्या अध्यक्षा झाल्या तेव्हापासून आमच्या पक्षात डोकावण्याचा डोमकावळे प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या पक्षात काय चाललंय हे त्यांनी पाहावं. अजित पवारांनी पक्ष चोरला, अजित पवारांनी चिन्ह चोरलं अशा प्रकारचे वक्तव्य करणारे काही महाभाग आता आमच्या पक्षात डोकावण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार यांच्या निधानाच्या दिवशीच पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू करून सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना अलिप्त ठेवून पक्ष ताब्यात घेण्याची एवढी घाई काहींना झाली होती. त्यामुळे त्या कालावधीत आलेली काही वक्तव्य आपण पाहिली आहेत”, असं म्हणत सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली.

“अजित पवार यांच्याविरोधात ज्या पद्धतीने कटकारस्थान झालं, त्याच पद्धतीने आज सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार आणि आमचा पक्षाच्या विरोधात केलं जात आहे. मात्र, हे कटकारस्थान जनता आणि पक्षाचे आमचे सर्व पदाधिकारी हाणून पाडतील”, असंही सुनील तटकरे म्हणाले.

सुनील तटकरे पुढे म्हणाले की, “अजित पवार असतानाही मला अनेकवेळा टार्गेट केलं गेलं. २००४, २००९ साली अनेकदा टार्गेट केलं गेलं. २०१४ पासून तर मला टार्गेट करणं अधिक वाढत गेलं. मात्र, अजित पवार यांच्यामागे आम्ही सावली सारखं उभे राहिलो. स्वभाविकपणे अजित पवार यांची त्या काळात उंचावलेली प्रतिमा आणि अजित पवार यांनी पक्षाच्या संघटनेवर जी काही पकड मिळवली होती, त्यामध्ये आमचा सहभाग असल्यामुळे आम्हाला टार्गेट करणं स्वभाविक आहे. त्यामुळे मला त्यात काही नवल वाटत नाही”, असंही सुनील तटकरे म्हणाले.

सुनील तटकरेंचा रोहित पवारांना इशारा

“पक्षाच्या विलीनीकरणाबाबत देखील त्यांना तेच वाटत होतं. मी त्यांना आज एवढंच सांगतो की अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर जेव्हा त्याचं पार्थिव रुग्णालयात आलं आणि त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं, तिथपासून काय-काय घडलं. या सगळ्या गोष्टीची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे कृपा करा आणि थांबा. अन्यथा काही गोष्टी मला पुढच्या कालावधीत सांगाव्या लागतील. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्याविरोधात तुम्ही काय कटकारस्थान करत होतात, त्याबाबतची सविस्तर माहिती आमच्या सगळ्यांकडे आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले. दरम्यान, तुमचा इशारा रोहित पवारांना आहे का? असं विचारलं असता तटकरे म्हणाले की, “ज्याला इशारा असेल त्यांनी तो समजून घ्यावा.”

“काळाच्या ओघात जनतेला त्यांचं काय स्थान आहे हे माहिती आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी (रोहित पवारांनी) एक फार मोठा दौरा काढला होता. पण त्यांच्या त्या दौऱ्यात ५० माणसं देखील नव्हती. आमच्या पक्षाच्या एखादा युवा कार्यकर्ता जरी एखाद्या ठिकाणी गेला तरी त्यापेक्षा जास्त कार्यकर्ते जमतात. त्यामुळे त्यांचं अस्वस्थ मन असल्यामुळे अस्वस्थ मनातून कावीळ झाल्यासारखे वक्तव्य केले जात आहेत”, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली.

‘काहींचा मनसुबा पक्ष हायजॅक करण्याचा’

“अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यापाठीमागे पक्ष खंबीरपणे उभा आहे. मात्र, काहींचा मनसुबा पक्ष हायजॅक करण्याचा होता. तुम्ही पाहिलं असेल की अजित पवार यांच्या निधनाच्या दिवसापासूनच दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चा त्या राष्ट्रवादीमधील काही नेत्यांनी सुरू केल्या होत्या. मात्र, त्यांना ते शक्य झालं नाही. त्यामुळे ते आता आमच्या विरोधात बोलत आहेत”, असं सुनील तटकरे म्हणाले.