राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. यादरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून यासाठी पुढाकार घेण्यात आला, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील नेत्यांमध्ये काहीसा संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट यांचे विलीनीकरण होणार की नाही? या मुद्दा कळीचा बनला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून विलिनीकरणाबाबत वेगवेगळे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. आमदार रोहित पवार यांनी १२ फेब्रुवारीला या पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाबाबत काय बोलणी झाली, तसेच इतर माहिती देणार आहेत. यादरम्यान आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचेही महत्त्वाचे विधान केले आहे.सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर आम्हाला विलीनकरण करावेच लागेल, असेही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुनील तटकरे म्हणाले की, “हसन मुश्रीफ जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आम्ही सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू. १० तारखेला मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी (सुनेत्रा पवार) तेथे येतील, तेव्हा या विषयावर नक्कीच चर्चा करू. कदाचित मग त्या दिल्लीतही येऊ शकतील. राष्ट्रपती महोदयांची भेट, पंतप्रधानांची भेट, राज्यसभेच्या त्या सदस्या आहेत, त्या संदर्भातील ज्या संवैधानिक जबाबदार्‍या आहेत… आम्ही योग्य वेळेला बसून त्याबद्दल निर्णय करू.”

विलिनीकरणाबाबतचा सुनेत्रा पवार निर्णय घेतील का? त्यांच्याकडे ही सर्व निर्णय प्रक्रिया असणार आहे का? की तुमच्या पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये विलिनीकरणाबाबत पुन्हा चर्चा होईल? असा प्रश्न सुनील तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “आम्ही २०२३ ला निर्णय घेतला तो आम्ही एकत्र बसून घेतला. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाच्या आणि पक्षाच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्या संदर्भात एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दादांचा राजकीय परिवार आहे. जो नेटाने, आत्मविश्वासाने, कणखरपणाने… राजकीय इच्छाशक्ती ही दादांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर ज्या पद्धतीने दाखवली दाखवली आणि राज्यातील १३ कोटी जनतेने आम्हाला ७३ टक्के स्ट्राईक रेट देत आम्हाला विजयी केलं. त्यामुळे स्वभाविकपणे आम्ही या संदर्भातील निर्णय योग्यपणाने घेऊ.”