Sunil Tatkare vs Rohit Pawar Kaki remark controversy latest updates : अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी सर्व सूत्रे हाती घेतली आहे. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपदही स्वीकारलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारताना आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुनेत्रा पवारांसोबत झालेल्या गैरवर्तनावर रोहित पवारांनी टीका केली. काकींबरोबर नीट वागा, असा दमच त्यांनी भरला आहे. याबाबत आज सुनील तटकरे यांनाही विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
“सुनेत्रा काकी या अजितदादांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. सुनेत्रा काकी उपमुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे स्टेजवर वागताना व्यवस्थित वागा. महाराष्ट्र या चार नेत्यांना पाहत आहे. दादांचा या चार नेत्यांवर वचक होता. काकींनी कुठे बसायचं याची जागा ते ठरवत होते. कुणी तरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवत होता. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. काकींचा आदर आहे. आदर ठेवा. सांभाळून वागा आणि सांभाळून बोला”, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांच्या नेत्यांना दम भरला.
सुनील तटकरे काय म्हणाले?
दरम्यान, अजित पवारांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. त्यानिमित्ताने सुनील तटकरे आज बारामती येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर गेले होते. तेथून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारलं. त्यावर ते म्हणाले, “कोणाला काय बोलायचं आहे ते त्यांनी बोलावं.. एक बाब नक्की आहे की आम्ही निर्णय घेतल्यानंतर किंवा त्याआधी कोण कुठे काय करत होते? दादांवर प्रखर जहरी टीका करत होते हे महाराष्ट्राने अनुभवलं आहे. २०१९ मध्ये भाजपाकडे कोण तिकिट मागायला गेले होते, याची आमच्याकडेही माहिती आहे.”
“२०२३ पासून दुर्दैवी घटना घडेपर्यंत कोण काय टीका करत होते, हे ज्ञात आहे. त्यामुळे मी स्मृती स्थळावर मी आलो आहे. मला याबाबत काही बोलायचं नाही. माझ्याकडेही अनेक माहिती आहे. मी अनेक क्षणांचा, घटनांचा साक्षीदार आहे. मला साऱ्या गोष्टी ज्ञात आहेत”, असंही सुनील तटकरे म्हणाले.
