मुंबई : ज्यांच्या नावाने पत्रकार परिषद बोलावलेली असते, त्यांनी पत्रकार परिषदेत संबांधणे अपेक्षीत असते. मंत्र्यांच्यासोबतच्या नेत्यांनी या राजशिष्टाचाराचे पालन करायला हवे. इतरांनी पत्रकार परिषदेत हस्तक्षेप करणे, परस्पर उत्तर देणे चुकीचे आहे, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांना फटकारले आहे.
बीड जिल्ह्यात उपमख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार दौऱ्यावर असताना. जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. शेजारी बसलेल्या धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप केला. मुंडेंनी प्रश्नकर्त्या पत्रकाराला रोखले आणि पत्रकार परिषद थांबवली. यासदंर्भातली दृश्यचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. त्यावर प्रदेश काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ संबोधले. सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभरात दोन दिवस आंदोलन करत आहेत.
मंत्र्यासोबतच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत शिष्टाचाराचे भान ठेवले पाहिजे. यापुढे आमचे कार्यकर्ते जबाबदारीने वागतील, असे तटकरे म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ यांची आमच्या राष्ट्रीय नेत्यांवरील टीका योग्य नव्हती. काँग्रेसने आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवली आहे. सपकाळ यांनी वक्तव्याबाबत दिलगीरी व्यक्त केली असली तरी आमच्या कार्यकर्त्यांच्या मनातील संताप संपणार नाही, असे स्पष्ट करत तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या आंदोलनाचे समर्थन केले.
