महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. महाराष्ट्राला शोकसागरात टाकणारीच ही घटना होती. अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी म्हणजेच ३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सगळ्या घडामोडी घडत असताना शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष यांचं विलीनीकरण होणार होतं अशा चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत भाष्य केलं आहे. अजित पवार यांचं पार्थिव समोर असताना काही जण विलीनीकरणाच्या चर्चा करत होते असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले सुनील तटकरे?
पुरोगामी महाराष्ट्रात दहावा आणि बारावा केला जातो, तो एक विचार आहेच. कारण हा विचार हिंदू धर्माच्या परंपरेतून चालत आला आहे. पण अनेकदा तीन दिवसांनंतरही अनेक कुटुंबांमध्ये हे विधी संपतात. शिवाय आम्हाला जे कुणी प्रश्न विचारत आहेत त्यांना हे सांगेन की अजितदादांचा मृतदेह अंत्यदर्शनाला ठेवला होता तेव्हापासून विलीनीकरणाची चर्चा सुरु करण्याची घाई का झाली? एक दोन नाही तर सात ते आठ नेत्यांनी मुलाखतींचा सपाटा लावला होता. दादांची अंतिम इच्छा आहे, या तारखेला विलीनीकरण होणार होतं वगैरे सांगितलं गेलं. जे विलिनीकरणाबाबत बोलत होते त्यांनी कधी हे म्हटलं का की आता उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं आता उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घ्यावीत. हे कुणाच्या मनात आलं का? विलिनीकरणाची चर्चा, दादांची अंतिम इच्छा वगैरे बोलत राहिले असं वक्तव्य सुनील तटकरेंनी केलं आहे. साम मराठीच्या ब्लॅक अँड व्हाईट या विशेष कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान सुनील तटकरेंनी उल्लेख केलेले नेते कोण? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
अजितदादांची इच्छा भाजपासह जाण्याचीच होती
सुनील तटकरे म्हणाले अजितदादांची इच्छा सुरुवातीपासून भाजपासह जावं अशीच होती. २०१४ पासून ते भाजपासह जाण्यास इच्छुक होते. ही इच्छा त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. २०१९ ला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह शपथविधीही केला होता. पण तो प्रयोग अपयशी ठरला. २०२३ मध्ये अजित पवार एनडीएमध्ये सहभागी झाले, राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. निवडणूक आयोगाकडे जेव्हा पक्ष कुणाचा हा निर्णय गेला तेव्हा निवडणूक आयोगाने घड्याळ चिन्ह हे अजित पवारांना दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नावही अजित पवारांना दिलं असंही सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.
