अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील लोकभवन येथे साध्या पद्धतीने हा शपथविधी पार पडला. दरम्यान या कार्यक्रमाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना बोलावण्यात आले नव्हते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाने शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी शपथविधीला येऊ नये असे सांगितले होते का? ते कार्यक्रमाला का नव्हते असे प्रश्न सुनिल तटकरे यांना विचारण्यात आले. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, “एकदा शपथविधी नक्की झाला की, राज्य सरकारच्या शिष्टाचार विभागामार्फत ते केले जात असते. त्या संबंध निर्णय प्रक्रियेमध्ये, दुपारी २ वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक, विधिमंडळ पक्षाने एकमताने निवड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना विधिमंडळ पक्षाच्या वतीने आम्ही पत्र सादर केलं आणि मुख्यमंत्र्यांनी शपथ नक्की केली.”
जमीन घोटाळ्यात नाव पुढे आल्याने पार्थ पवार सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हते अशीही चर्चा सुरू होती. यावेळी पार्थ पवार हे देखील शपथविधीला का उपस्थित नव्हते? असाही प्रश्न तटकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, “त्या दिवशी पार्थ पवार बारामतीमध्ये थांबले. अनेकजण संवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांना भेटत होते. पार्थ पवार हे अजित पवारांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. सर्वांच्या सांत्वनपर भेटी झाल्यानंतर पार्थ पवार मुंबईला आले,” असे सुनील तटकरे म्हणाले.
विलिनीकरण होणार का?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण होणार की नाही? या रोखठोक प्रश्नावरदेखील तटकरे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, मी वारंवार गेले सहा महिने म्हणत आलो, दादा असतानाच म्हणत आलो की, आम्ही एनडीएमध्ये आहोत, या निर्णयाशी ज्यांची अनुकूलता असेल त्यांचा त्या संदर्भातील निर्णय त्यांनी करायचा आहे. त्यांनी तो निर्णय केल्यानंतर याबाबतची स्पष्टता येईल.”
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना भाजपाकडून नियंत्रित केले जात असल्याबद्दल चर्चा होताना दिसत आहेत. याबद्दल तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हा देशातील एक प्रमुख पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मित्रपक्ष म्हणून अजित पवार यांच्या संमतीने त्यांच्याबरोबर गेलेला आहे. भारतीय जनता पक्षाने आम्हाला आमच्या पक्षांतर्गत काय निर्णय घ्यावेत हे कधीही सांगितलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वातंत्र्य बाण्याचा, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. आमचे निर्णय आम्ही घेणार,” असेही तटकरे म्हणाले.

